कोण पास, कोण फेल, ४ जूनला निकाल
By रवींद्र चांदेकर | Published: May 4, 2024 04:08 PM2024-05-04T16:08:55+5:302024-05-04T16:10:45+5:30
सर्वांचीच धडधड वाढली : विधानसभेचा गड सर करण्याची चिंता
वर्धा : लोकसभेसाठी २६ एप्रिलला मतदान पार पडले. त्याला आठ दिवस लोटले. निवडणुकीत खासदारांसह आमदारांचीही परीक्षा पार पडली. या परीक्षेत नेमके कोण पास झाले अन् कोण फेल झाले, याचा ४ जूनला मतमोजणीअंती निकाल लागणार आहे.
वर्धा लोकसभा मतदारसंघात तब्बल ६४.८५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तत्पूर्वी १६ दिवस प्रचार तोफा धडधडत होत्या. गावोगावी प्रचाराचा धुराळा उडला होता. जागोजागी निवडणुकीची चर्चा सुरू होती. मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी उमेदवार आणि त्यांचे समर्थक जिवाचे रान करीत होते. लोकसभा मतदारसंघातील आमदारही आपापल्या उमेदवारासाठी घाम गाळत होते. निवडणूक खासदारकीची, मात्र परीक्षा आमदारांची होती. त्यामुळे सर्व आमदार आपापल्या विधानसभा मतदारसंघात परिश्रम घेत होते. अगदी २५ एप्रिलच्या रात्रीपर्यंतपर्यंत त्यांनी जोमाने काम केले. त्यानंतर २६ एप्रिलला प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही आमदारांनी मतदार बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.
निवडणुकीची तारीख आणि उमेदवारी घोषित झाल्यापासून जवळपास २३ ते २५ दिवस निवडणुकीची धामधूम सुरू होती. अहोरात्र उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते, पक्षाचे पदाधिकारी कामात मग्न होते. आपला उमेदवार कसा विजयी होईल, याची रणनीती आखण्यात ते व्यस्त होते. यानंतर प्रत्यक्ष मतदानाचा दिवस उजाडला. २६ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. मतदारांनी आपल्या मनातील उमेदवाराच्या नाव व चिन्हासमोरील बटण दाबून आपले ‘दानाचे कर्तव्य’ निभावले. मतदार आपले कर्तव्य निभावून निश्चिंत झाले असले तरी आता उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची चुळबुळ सुरू झाली आहे.
खासदारकीच्या या निवडणुकीत सहा आमदारांनी परीक्षा दिला. त्यापैकी किती आमदार परीक्षेत पास अन् फेल झाले, याचा उलगडा ४ जूनला मतमोजणीअंती होणार आहे. कोणत्या आमदाराच्या विधानसभा मतदारसंघात ‘त्यांचा’ उमेदवार सरस ठरतो, यावरून त्यांची परीक्षा होणार आहे. त्यांच्या मतदारसंघात उमेदवार आघाडीवर किंवा मागे राहिल्यास, त्याचे फळ त्यांना मिळू शकते. त्यावरूनच त्यांची पुढील विधानसभेची उमेदवारी ठरण्याची शक्यता आहे. त्यांचा उमेदवार माघारल्यास त्यांच्याऐवजी मतदारसंघातील ‘नव्या’ इच्छुकाला संधी मिळण्याची शक्यता आहे.
पाच विरुद्ध एक आमदार
निवडणुकीत महायुतीच्या बाजूने पाच, तर महाविकास आघाडीच्या बाजूने एक विधानसभा आमदार होते. यापैकी गेल्यावेळी महायुतीच्या उमेदवाराला मोर्शी विधानसभा मतदारसंघात ४८ हजार, हिंगणघाटमध्ये ३८ हजार, वर्धेत ३७ हजार, आर्वीत २६ हजार, धामणगावमध्ये १८ हजार, तर देवळी विधानसभा मतदारसंघातून १६ हजारांच्या वर आघाडी होती. महाविकास आघाडीच्या उमेदवार सर्वच विधानसभा मतदारसंघात मागे होत्या. या निवडणुकीत ही आघाडी कमी झाल्यास महायुतीसोबत असणाऱ्या आमदारांची चांगलीच गोची होणार आहे. विशेषत: दोन टर्मपासून आमदार असणाऱ्यांना पुन्हा उमेदवारी मिळविणे दुरापास्त होण्याची शक्यता आहे. अशावेळी विधानसभा निवडणुकीदरम्यान काही जण ऐनवेळी ‘दलबदल’ करण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. महाविकास आघाडीच्या बाजूने असलेल्या आमदारांच्या विधानसभेत त्यांच्या उमेदवाराला आघाडी न मिळाल्यास त्यांनाही पुढे उमेदवारी मिळविणे जड जाण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी त्यांनी अत्यंत ताकदीने काम केल्याचे सांगितले जात आहे.
मतदारांच्या मौनाने वाढवली चिंता
मतदार आपले कर्तव्य निभावून मौन झाले आहेत. त्यांनी आपले पत्ते अद्याप उघड केले नाही. मात्र, त्यांच्या भरवशावर विविध पक्षांचे कार्यकर्ते, गावपुढारीच अंदाज बांधत सुटले आहेत. मतदारांनी आपल्याच उमेदवाराला मत दिल्याचा कार्यकर्त्यांना विश्वास आहे. त्या आधारावरच त्यांचे गणित सुरू आहे. त्यातून विजयाची गुढी उभारण्यासाठी ते आतुर झाले आहेत. मात्र, मतदार मौन असल्याने त्यांची चिंता वाढली आहे. खरे चित्र ४ जूनलाच स्पष्ट होणार आहे.