‘त्या’ केंद्र प्रमुखांवरील कारवाई रोखली कुणी
By admin | Published: July 11, 2017 01:00 AM2017-07-11T01:00:41+5:302017-07-11T01:00:41+5:30
वर्धा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नालवाडी येथील केंद्र प्रमुख सुनील पावडे यांच्याबाबत जिल्हा परिषद पदाधिकारी व केंद्राच्या अधिनस्त काम करणाऱ्या शिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्या आहे;
भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पडला प्रश्न : ग्रामीण विकास मंत्र्यांच्या आदेशानंतरही जि.प. प्रशासन ढिम्मच
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नालवाडी येथील केंद्र प्रमुख सुनील पावडे यांच्याबाबत जिल्हा परिषद पदाधिकारी व केंद्राच्या अधिनस्त काम करणाऱ्या शिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्या आहे; पण पावडे यांच्यावर अद्याप जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही. पावडे यांना कुणाचा अभय आहे व त्यांच्यावरील कारवाई रोखण्यात जिल्हा परिषदेच्या यंत्रणेवर कोण दबाव आणत आहे, असा प्रश्न भाजपच्या जिल्हा परिषद वर्तूळातील सदस्य व पदाधिकाऱ्यांना पडला आहे.
केंद्र प्रमुख पावडे यांच्या केंद्रांतर्गत जिल्हा परिषदेसह खासगी अशा १७ शाळा आहेत. पावडे यांच्या संदर्भात अनेक तक्रारी जिल्हा परिषद शिक्षण विभागाला यापूर्वीही करण्यात आल्या आहेत. नालवाडी जिल्हा परिषद क्षेत्राच्या सदस्य नूतन प्रमोद राऊत यांच्याकडेही तक्रारी आल्यानंतर त्यांनी या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी २७ जून २०१७ रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी पावडे यांच्यासोबत शाळांना भेटी दिल्या. या भेटी दरम्यान पावडे यांच्याकडून या केंद्रांतर्गत कार्यरत अनेक शिक्षकांना मानसिक त्रास होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. तसेच शिक्षकांचे खच्चीकरणही त्यांच्याकडून होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर यासंदर्भात राऊत यांनी शिक्षण विभागाच्या यंत्रणेकडे तक्रार करीत केंद्र प्रमुख पावडे यांना निलंबीत करून त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. वर्धा पंचायत समितीने केंद्र प्रमुख पावडे यांच्यावर कारवाई करावी, असा ठराव एकमताने पारित केला आहे. शिवाय जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत तसेच सर्व साधारण सभेतही पावडे यांच्यावर कारवाईचा ठराव पारित करण्यात आला; पण जिल्हा परिषदेच्या यंत्रणेने अद्यापही पावडे यांच्यावर कारवाई केलेली नाही. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांनी राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे या संदर्भात तक्रार दाखल केली. मुंडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या प्रकरणी पावडे यांच्यावर कारवाई करून अहवाल सादर करण्याची सूचना दिली; पण पावडे यांच्यावरील कारवाईला बगल दिली जात असल्याचेच दिसते.
जि.प. अध्यक्षांनी दिले निलंबनाचे निर्देश
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी यांच्याकडेही जि.प. सदस्य नूतन राऊत यांनी ७ जुलै २०१७ रोजी तक्रार केली. यात केंद्र प्रमुख पावडे यांना निलंबित करण्याची मागणी लेखी स्वरूपात करण्यात आली. यानंतर जि.प. अध्यक्षांनी केंद्र प्रमुखाला निलंबित करण्यात यावे, असे निर्देश मु्ख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेत; पण त्यानंतरही कारवाई झालेली नसल्याची माहिती राऊत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. पावडे यांच्यावर कारवाई न झाल्यास नालवाडी परिसरातील नागरिक व पालकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही राऊत यांनी दिला आहे. वरिष्ठांच्या निर्देशानंतरही कारवाई होत नसल्याने जिल्हा परिषद वर्तूळात आश्चर्य व्यक्त होत आहे.