गाव तिथे एसटी फक्त शहरांसाठीच का धावतेय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 05:00 AM2021-07-18T05:00:00+5:302021-07-18T05:00:15+5:30
मागील दीड वर्षांपासून कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागीलवर्षी तब्बल पाच महिने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. यंदाही मार्च महिन्यापासून कोरोनाने थैमान घातल्याने ४५ दिवस एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. जूनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने शासनाकडून निर्बंध शिथिल करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : एसटी महामंडळाने लांब पल्ला, आंतरराज्य, मध्यम आणि साध्या बसेस सुरू केल्या आहेत. मात्र ग्रामीण भागात अद्यापही बसेस जात नाहीत. त्यामुळे ग्रामीण प्रवाशांची मोठी गरसोय होत आहे. त्यामुळे गाव तेथे एसटी हे ब्रीद नावालाच ठरत असल्याचे दिसून येत आहे.
मागील दीड वर्षांपासून कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागीलवर्षी तब्बल पाच महिने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. यंदाही मार्च महिन्यापासून कोरोनाने थैमान घातल्याने ४५ दिवस एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. जूनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने शासनाकडून निर्बंध शिथिल करण्यात आले.
यामुळे एसटीही पूर्ण क्षमतेने धावू लागली आहे. वर्धा विभागाअंतर्गत वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव, तळेगाव (श्यामजीपंत) असे पाच आगार असून, पाचही आगार मिळून एकूण २२८ एसटी बसेस आहेत. कोरोना संकट काळापूर्वी सर्वच बसेस धावत होत्या. आठशेवर फेऱ्या दररोज होत होत्या. दररोज सरासरी २० लाख इतके वाहतूक उत्पन्न वर्धा विभागाला मिळत होते. कोरोना काळात विभागाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला. कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने राज्य शासनाकडून निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. एसटीची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. दररोज २०० ते २१० बसेस धावत असून, ३८०-४०० फेऱ्या होत आहेत. मात्र प्रवासी संख्येअभावी अद्याप जिल्ह्यातील ग्रामीण भागात एसटी बसेस पोहोचत नसल्याने ग्रामीण नागरिकांना खासगी वाहन अथवा काळी-पिवळी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
खेडेगावांत जाण्यासाठी काळी-पिवळीचा आधार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीड महिन्यानंतर एसटीची प्रवासी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. दररोज २०० बसेस धावत असून, ४०० च्या जवळपास फेऱ्या होत आहेत. मात्र जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बसफेऱ्या सुरू झाल्या नाहीत. यामुळे ग्रामीण प्रवाशांना काळी- पिवळी वाहनांचा आधार घेत जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. ग्रामीण भागात बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.
हजार कि.मी.चा प्रवास, पण फक्त शहरांचाच!
nवर्धा विभागातील पाचही आगार मिळून २०० च्या जवळपास बसेस सोडल्या जात आहेत. दररोज ३८० ते ४०० फेऱ्या होत आहेत. दररोज हजार-दीड हजार किलोमीटरचा प्रवास होत असून, केवळ तालुका ठिकाणापर्यंतच होत आहे. यामुळे ग्रामीण प्रवाशांची गैरसोय कायमच आहे.
अद्याप उत्पन्नाला फटका
nदुसरी लाट ओसरल्यानंतर वर्धा विभागाकडून दररोज २०० बसेस सोडल्या जात असून, हजारावर किलोमीटर बसेसनी प्रवास केला. मात्र डेल्टा प्लसमुळे प्रवाशांचा हवा तसा प्रतिसाद नसल्याने दररोज ८ ते १० लाखांचे वाहतूक उत्पन्न वर्धा विभागाला मिळत आहे. विभागाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
खेडेगावावरच अन्याय का?
कोरोनामुळे दीड महिना एसटीची प्रवासी वाहतूक पूर्णतः ठप्प होती. आता एसटीची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आलेली आहे. दररोज २०० च्या जवळपास बसेस सोडल्या जात आहेत. मात्र प्रवाशांचा अद्याप हवा तसा प्रतिसाद नसल्याने काही ग्रामीण भागाकडे बसफेऱ्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत. प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन यापुढे सर्वच बसेस सोडू.
- चेतन हसबनीस,
विभाग नियंत्रक, वर्धा.
कोरोनामुळे विस्कळीत झालेले जीवन हळूहळू पूर्व पदावर येत आहे. एसटीची वाहतूक पूर्व पदावर आलेली आहे. तालुक्याच्या ठिकाणी बसेस पोहोचत असताना, दुर्गम भागात अद्याप बसफेऱ्या सोडण्यात येत नाहीत. ग्रामीण प्रवाशांवरच हा अन्याय का?
- विलास लभाने,
प्रवासी, गिरड.
खरीप हंगाम तोंडावर असताना कोरोना संकटामुळे दीड महिना एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. त्यामुळे शेतीसाठी लागणारे, बी-बियाणे अवजारे खरेदीवर मोठा परिणाम झाला. शहराच्या ठिकाणी बसफेऱ्या सोडल्या जात असताना, ग्रामीण भागावरच अन्याय का? ग्रामीण जनतेची गैरसोय टाळण्याकरिता बसफेऱ्या पूर्ववत सुरू कराव्यात.
- दगडू महाजन, ग्रामीण प्रवासी.