पत्नीच्या प्रियकराने पतीला केले 'खल्लास' जिवे मारण्याची दिली होती धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 04:48 PM2024-10-15T16:48:16+5:302024-10-15T16:50:10+5:30
चार ते पाच पथके आरोपीच्या शोधार्थ रवाना : वर्धा येथील त्रिमूर्तीनगरातील घटनेने उडाली खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विवाहित प्रेयसी बोलत नसल्याने संतापलेल्या प्रियकाराने विवाहितेच्या घरात जाऊन तिच्या पतीला शिवीगाळ करून धारदार शस्त्राने पोटावर व छातीवर वार करून खल्लास केले. ही थरारक घटना शहरातील पिपरी (मेघे) ग्रामपंचायत हद्दीतील त्रिमूर्तीनगर वॉर्ड क्रमांक ३ मध्ये १३ रोजी रात्री ८:४० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी मध्यरात्री २:०० वाजता रामनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
नीलेश बांढरे (रा. त्रिमूर्तीनगर) असे मृतकाचे नाव आहे. तर सचिन अशोक पाराशर (रा. हिंगणघाट) असे फरार असलेल्या मारेकऱ्याचे नाव आहे. मृत नीलेश याला दारुचे व्यसन असल्याने त्याची पत्नी प्रणाली यांच्यात दीड ते दोन वर्षांपासून मतभेद निर्माण झाले होते. त्यामुळे नीलेशची पत्नी मुलांसह डिसेंबर २०२३ मध्ये अल्लीपूर येथे तिच्या आईकडे राहण्यास गेली होती. त्यानंतर जून २०२३ मध्ये मुलाच्या अॅडमिशनसाठी ती वर्ध्याला आली आणि पती नीलेशकडे जवळपास एक महिना राहिली. मात्र, नीलेशने पुन्हा वाद केल्याने प्रणाली जुलै २०२३ मध्ये हिंगणघाट येथे तिच्या बहिणीकडे राहण्यास गेली होती.
त्यावेळी तिची ओळख आरोपी सचिन पाराशर याच्याशी झाली. दोघांत जवळीक निर्माण होत संबंध जुळले. मात्र, ही बाब विवाहितेच्या नातेवाइकांना माहिती पडल्याने त्यांनी समजूत घातल्याने विवाहितेने आरोपी सचिनसोबत बोलणे बंद करून पुन्हा मे २०२४ मध्ये पतीकडे नांदण्यास गेली होती. मात्र, सचिन वारंवार माझ्याशी का बोलत नाही, माझ्याशी संबंध ठेव, असे म्हणत होता विवाहितेने नकार दिला असता, सचिन पाराशर याने विवाहितेच्या घरात प्रवेश करत पती नीलेशवर धारदार चाकूने सपासप पोटावर, छातीवर, हातावर वार करून त्याची हत्या केली.
या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली, रामनगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला असून, आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.
असा घडला घटनाक्रम
विवाहिता १३ रोजी सकाळी ८:०० वाजता दुचाकीने अल्लीपूर येथे गेली होती. तेथून दुपारी ४:०० वाजता वर्ध्यात आली. घरी न जाता ती मैत्रिणीकडे गेली. तेथे अर्धा तास थांबल्यानंतर पती नीलेशचा फोन आला. विवाहिता पतीला घेण्यासाठी कारला चौकात गेली. दोघेही घरी गेले असता सायंकाळी ६:०० वाजता आरोपी सचिन याने फेसबुकवर मेसेज करून भेटण्यासाठी तगादा लावला. मात्र, त्यावर विवाहितेने रिप्लाय दिला नाही. सायंकाळी ६:३० वाजता सचिनने फोन करून विवाहितेच्या पतीला शिवीगाळ केली आणि रात्री ८:४० वाजता सचिन तोंडाला पांढरा दुपट्टा बांधून हातात चाकू घेऊन आला आणि नीलेशच्या पोटावर व छातीवर वार करून त्याची निघृण हत्या केली.
जिवे मारण्याची दिली होती धमकी
आरोपी सचिन पाराशर याने विवाहितेच्या मोबाइलवर मेसेज करून संबंध ठेवण्यासाठी तगादा लावला होता.
मात्र, विवाहितेने नकार दिल्यानंतर आरोपीने विवाहितेला तुझ्या पतीला आणि तुला जिवानिशी ठार मारेन, अशी धमकी दिली होती. अखेर सचिनने नीलेशचा काटा काढला.