वन्यजीव सप्ताह विशेष : मानव-वन्यजिवांच्या जगण्यातील संघर्षाने पर्यावरणाची हानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2021 11:01 AM2021-10-08T11:01:55+5:302021-10-08T11:03:42+5:30
भारतात १९५२ पासून वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे. नामशेष होत चाललेल्या वन्यजिवांचे संरक्षण-संवर्धन करून त्याबाबत जागृती करणे हा त्यामागील हेतू आहे. हा हेतू रुजविण्यासाठीच भारत सरकारने ‘इंडियन बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ’ची स्थापना केली आहे. (wildlife week special)
वर्धा : देशाच्या संमृद्धतेमध्ये वन्यजिवांचे अतिशय महत्त्व आहे. बंगालचे वाघ, आशियातील एकशिंगी गेंडे व भारतीय मोर अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण वन्यप्राण्यांचे सुरक्षित वस्तिस्थान बनण्यासाठी भारतामध्ये अतिशय पोषक वातावरण आहे. येथील वन्यजिवांचे राष्ट्रीय चिन्हांमध्येही दर्शन घडते. त्याचबरोबर पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि संस्कृती यातही वन्यजीव महत्त्वाची भूमिका बजावत असतात. (wildlife week special)
पण, अलीकडे मानव आणि वन्यजिवांमध्ये जगण्यातून संघर्ष निर्माण झाला आहे. यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असल्याने वन्यजिवांचा अधिवास धोक्यात आला आहे. त्यामुळे हे निसर्गचक्र, निसर्गसौंदर्य आणि वैविध्यता कायम राखण्याकरिता वन्यजीव सप्ताहाच्यानिमित्ताने का होईना, मानवाने त्यांच्या संरक्षणाकरिता हातभार लावण्याची गरज आहे. अलीकडच्या काही वर्षांत वन्यजिवांच्या संरक्षणासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसत आहे.
लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या अनेक प्रजातींचे संरक्षण विविध योजनांमुळे होत आहे. भारतात १९५२ पासून वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे. नामशेष होत चाललेल्या वन्यजिवांचे संरक्षण-संवर्धन करून त्याबाबत जागृती करणे हा त्यामागील हेतू आहे. हा हेतू रुजविण्यासाठीच भारत सरकारने ‘इंडियन बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ’ची स्थापना केली आहे. यातून वन्यजिवांच्या संरक्षणाकरिता प्रयत्न होत आहे. वन्यजिवांना धोका निर्माण करण्यासाठी अनेक बाबी कारणीभूत असून, त्याला आळा घालण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.
वन्यजीव विनाशाची काही प्रमुख कारणे
- वृक्षतोड
शहरीकरण, उद्योग, रस्ते, धरणे, व्यापारासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने वन्यजीव व पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. २००९ मध्ये जंगल नष्ट होण्याच्या प्रमाणात भारत जगातील पहिल्या दहामध्ये होता.
- नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर
वन्यजिवांच्या अधिवासातून नैसर्गिक संसाधनांचा अविचारी पद्धतीने उपसा सुरू असल्याने अधिवास प्रभावित झालेत. उदा. कोळशाच्या खाणी, रेती उपसा, जंगलातील लाकूड व इतर उपयोगी पदार्थ.
- तस्करी
हत्ती, वाघ, गेंडे व हरिण या वन्यजिवांची आयव्हरी, नख आणि कातडींसाठी जगभरात बेकायदेशीररित्या तस्करी केली जाते. या व्यापारातून दरवर्षी ३५ ते ७० हजार कोटींची उलाढाल होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो.
- शिकार
अन्न, छंद, करमणूक किंवा अधिवासाकरिता अतिक्रमण करून वन्यजिवांची शिकार केली जाते. भारताच्या संपन्न वन्यजीव संपदेपुढे हे मोठे आव्हान आहे. त्यातून वन्यजीवच नाही, तर पर्यावरणाचा समतोल ढासळतो.
- रस्ते अपघात
जंगलातून होणाऱ्या नवीन महामार्गावर वन्यजिवांच्या अपघाताचेही प्रमाण वाढले आहे. जंगलातील महामार्ग वन्यजिवांचे नवीन शत्रू बनले आहेत. या महामार्गावर वाहनांनी मारलेल्या वन्यप्राण्यांची संख्या धक्कादायक आहे.
- जंगलातील रेल्वे रुळ
दाट वनातून जाणाऱ्या रेल्वेमार्गानेही वन्यजिवांचे जीवनमान प्रभावित झाले आहे. त्यांचे प्रजनन प्रभावित होणे ही चिंताजनक बाब मानली जाते. पश्चिम बंगालमधील चपरामारी रेल्वे रुळावर १७ हत्तींचा मृत्यू झाला होता.
- वणवे
कधी नैसर्गिक, तर कधी हेतूपुरस्सरपणे जंगलांना आगी लावण्याच्या घटना सतत घडतात. नुकताच ब्राझिल आणि ॲमेझॉनच्या जंगलांना लागलेल्या आगीने वन्यजिवांचे झालेले नुकसान न भरून निघणारे आहे.
राज्यातील वन्यजीव व्यवस्थापनाचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून वनविभागाने 'स्टेट वाइल्ड लाइफ अॅक्शन प्लॅन' आखला आहे. सन २०२१ ते २०३१ या १० वर्षांसाठी तो असून, याला मंजुरी मिळाल्यास हा राज्यातील पहिलाच प्रकल्प ठरणार आहे.
वन्यजीव आणि मानव यांच्यातील तीव्रता कमी करायची असेल, तर मुख्यत्वे विकास साधताना वन्यजिवांच्या नैसर्गिक अधिवासाचाही गंभीरपणे विचार करावा लागेल. शेतकऱ्यांना पिकांच्या संरक्षणासाठी सौरऊर्जेवर चालणारी विद्युत उपकरणे उपलब्ध करून द्यावी लागतील. वन्यजिवांचे मृत्यू अथवा त्यांच्यावर होणारे हल्ले अनैसर्गिक असले, तरी त्यामागची कारणे नैसर्गिक आहेत. कारण मानव आणि वन्यजीव दोघांकरिता हा संघर्ष जगण्याचा आहे, जिंकण्याचा नव्हे!
प्रा. संदीप पेटारे, वन्यजीव अभ्यासक