गांधी संस्थांमधील घुसखोरीविरुद्ध अहिंसक मार्गानेच लढा देणार : मेधा पाटकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2022 10:19 AM2022-04-18T10:19:57+5:302022-04-18T10:21:48+5:30
वर्ध्यातील दत्तपूर येथील महारोगी सेवा समितीचा वाद गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे.
वर्धा : देशभरामध्ये दलित, आदिवासी आणि गरिबांच्या जगण्याची संसाधने कार्पोरेट कंपन्यांकडे हस्तांतरित करण्याचा प्रकार चालविला आहे. यातून आता गांधी संस्थाही सुटलेल्या नाहीत. दत्तपूर येथील महारोगी सेवा समितीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रकारही यातलाच एक भाग आहे. गांधीवादी संस्थांची अशी अवस्था होणे हे चिंतनीय बाब आहे. याकरिता आम्ही अहिंसक सत्याग्रही मार्गाने लढा देणार असून, कायद्याच्या चाकोरीत राहून मैदानात उतरून सर्वांना सहभागी करून घेऊ, असे मत राष्ट्रीय आंदोलनाच्या समन्वयक मेधा पाटकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
वर्ध्यातील दत्तपूर येथील महारोगी सेवा समितीचा वाद गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. बाहेरून आलेल्या रामजी शुक्ला या व्यक्तीने बनावट कागदपत्रांच्या आधारे आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. इतकेच नाही तर या समितीमध्ये सेवक म्हणून आल्यानंतर कागदपत्रांची चोरी करून बनावट कागदपत्रांच्या आधारे आता मालक बनण्याचा खटाटोप तो करत आहे. या व्यक्तीबद्दल महारोगी सेवा समितीतील कुणालाही संपूर्ण माहिती नाही.
जिल्हा न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर शुक्ला यांच्याविरोधात निकाल दिल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत जिल्हा न्यायालयात माझे मत ऐकून घेतले नसल्याचे सांगितले. परिणामी उच्च न्यायालयाने पुन्हा ते प्रकरण जिल्हा न्यायालयाकडे पाठवले. अद्याप निर्णय झाला नसला तरीही शुक्ला यांनी गुंडप्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून महारोगी सेवा समितीमध्ये घुसखोरी केली आहे. त्यामुळे याप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करून रामजी शुक्ला यांच्यामागे कुणाचा हात आहे, याचाही आता शोध घेणार असल्याचे मेधा पाटकर म्हणाल्या. मगन संग्रहालयात आयोजित या पत्रकार परिषदेला स्वातंत्र्यसंग्राम सेनानी लिलाताई चितळे, मानवाधिकार कार्यकर्ते ॲड. असिम सरोदे व महारोगी सेवा समितीच्या अध्यक्ष डॉ. विभा गुप्ता उपस्थित होत्या.
पोलिसांनी न्यायाधीश होऊ नये!
बापूंच्या कर्मभूमीतच रामजी शुक्ला या व्यक्तीकडून रचनात्मक कार्यात ढवळाढवळ करून लोकशाहीवादी कार्यावर हल्ला करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. शुक्लाविरुद्ध पोलिसात चोरीची तक्रार केल्यानंतरही दखलपात्र गुन्ह्याची नोंद होत नसेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, त्या पोलीस कर्मचाऱ्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही. पोलिसांनी शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्याचे काम करावे, त्यांनी न्यायाधीश बनू नये, असा सल्ला ॲड. असिम सरोदे यांनी दिला. तसेच रामजी शुक्ला यांना येथून हद्दपार करण्यासाठी आम्ही वकिलांच्या टीमसह लढा देणार असल्याचेही सांगितले.