दिवाळीत तरी रेल्वेला जनरल डबे लागणार की नाहीत? प्रवाशांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2021 04:35 PM2021-10-26T16:35:03+5:302021-10-26T16:36:57+5:30
सध्या सुरू असलेल्या रेल्वेगाड्यांमध्ये जनरल डबे नसल्याने प्रवाशांना जादा दराने तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे जनरल डबे लागणार कधी, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे.
वर्धा : दिवाळीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते. मात्र, वर्धा जिल्ह्यात अजूनही पॅसेंजर रेल्वेगाडी सुरू न झाल्याने दिवाळीत तरी रेल्वेला जनरल डबे लागणार की नाहीत, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.
कोरोनामुळे केवळ स्पेशल रेल्वेंची वर्धा जिल्ह्यातील रुळांवरून धडधड सुरू आहे. नागरिकांना प्रवासासाठी आरक्षणाची अट असल्याने अनेकांना कमी अंतरासाठीही जादा रक्कम मोजावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी पॅसेंजर गाड्या आणि जनरल डबे लावावेत, अशी मागणी रेटून धरली होती. मागणीची दखल घेत रेल्वे विभागाने पॅसेंजर सुरू करण्याचा निर्णयही घेतला. मात्र, त्याचे पुढे काय झाले ते कुणास ठाऊक, तसेच सध्या सुरू असलेल्या रेल्वेगाड्यांमध्ये जनरल डबे नसल्यानेदेखील प्रवाशांना जादा दराने तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे जनरल डबे लागणार कधी, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे.
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
मुंबई ते हावडा स्पेशल.
अहमदाबाद ते पुरी स्पेशल.
पुणे ते नागपूर स्पेशल.
पुणे ते हावडा स्पेशल.
पुणे ते हटिया स्पेशल.
मुंबई ते नागपूर स्पेशल.
अजनी ते पुणे स्पेशल.
ओख ते खुर्द स्पेशल.
गांधीधाम ते विशाखापट्टनम स्पेशल.
स्पेशल तिकिटाची खिशाला कात्री
सध्या स्पेशल रेल्वेगाड्यांचीच धडधड सुरू असून, यामुळे कमी अंतरावर जाण्यासाठीदेखील पहिले आरक्षण काढावे लागत आहे. त्यामुळे विनाकारण खिशाला अतिरिक्त पैशाची कात्री बसत आहे. रेल्वे विभागाने याची दखल घेण्याची गरज आहे.
पॅसेंजर रुळावर कधी येणार?
१० ऑक्टोबर रोजीपासून पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला होता. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे पॅसेंजर सुरू होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांच्या आनंदावर विरजण पडले. आता पॅसेंजर रुळावर कधी येणार, असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांकडून विचारल्या जात आहे.
प्रवासी काय म्हणतात?
सध्या स्पेशल रेल्वे सुरू असल्याने कमी अंतराच्या प्रवासासाठीदेखील जादा पैसे मोजावे लागत आहेत. त्यातच जनरल डबे लागत नसल्याने आरक्षण पक्के करावे लागत आहे, याचा नाहक त्रास होतो आहे.
-प्रणय राऊत, प्रवासी
आरक्षणाची अट ठेवल्याने रेल्वेने प्रवास करणे सध्या टाळत आहे. कमी अंतरावर जाण्यासाठीदेखील जादा पैसे मोजावे लागत असल्याने आरक्षणाची अट रद्द करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.
-आशुतोष धोटे, प्रवासी