शिवशाही धावणार की थांबणार; जिल्ह्यात ११ बसेसची तपासणी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 17:08 IST2025-01-07T17:07:30+5:302025-01-07T17:08:05+5:30
वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर; महामंडळाकडून होतेय परीक्षण

Will Shivshahi run or stop? 11 buses inspected in the district!
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात शिवशाही बसची तपासणी केली जाणार आहे. या तपासणीनंतर राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे अहवाल सादर करण्यात येणार असून, त्यानंतर शिवशाही धावणार की थांबणार, हे ठरणार आहे.
वर्धा आगाराकडे ५, आर्वी आगाराकडे ३ व हिंगणघाट आगाराकडे ३ अशा एकूण ११ शिवशाही बसेस आहेत. वर्धा आगाराच्या ताफ्यात साधारणतः पाच ते सहा वर्षांपूर्वी शिवशाही दाखल झाली. प्रारंभी शिवशाहीचे महामंडळाचे चालक, वाहक, कर्मचाऱ्यांसह प्रवाशांतून स्वागत झाले. परंतु, शिवशाही बसच्या अपघाताच्या घटनांत वाढ झाल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न राज्य मार्ग महामंडळाच्या वतीने करण्यात येत असून, तपासणी अहवाल सादर झाल्यानंतर शिवशाही ताफ्यात राहणार की नाही, हे निश्चित होणार आहे. त्याअनुषंगाने वर्धा जिल्ह्यातील शिवशाही बसेसची तपासणी केली असता सर्व बसेस फिट आल्या आहेत.
सर्व शिवशाहींची तपासणी
राज्य मार्ग महामंडळाच्या वतीने सर्व आगारांतील शिवशाही बसेसची तपासणी करण्यात येत आहे. वर्धा जिल्ह्यातील आगारातील ११ शिवशाही बसची तपासणी करण्यात आल्याची माहिती आगार प्रशासनाने दिली.
११ शिवशाही बसची जिल्ह्यात तपासणी
जिल्ह्यात वर्धा आगाराकडे ५ व आर्वी आगाराकडे ३ व हिंगणघाट आगाराकडे ३ शिवशाही बसेस आहेत. या बसेसची तपासणी करण्यात आली असून, त्याचा अहवाल सादर होणार आहे.
अनेक बसेस झाल्या खिळखिळ्या
जिल्ह्यातील वर्धा, आर्वी व हिंगणघाट आगारांतर्गत प्रवासी संख्या मोठी आहे. परंतु, बसेसची संख्या अपुरी आहे. त्यातही बहुतांश बसेस जुनाट, खिळखिळ्या झाल्या आहेत. परिणामी, प्रवाशांवर मनस्तापाची वेळ येत आहे. त्याकरिता तीनही आगारांच्या ताफ्यात नवीन बसेस देणे आवश्यक आहे.
सर्व शिवशाही बसेसची तपासणी झाली
"जिल्ह्यातील वर्धा ५, आर्वी ३, हिंगणघाट ३ अशा ११ शिवशाही बसेस आहेत. या सर्व बसेस फीट आहेत. सर्व बसेस रस्त्यावर धावत आहेत."
- प्रताप राठोड, विभाग नियंत्रक वर्धा