शंकुतलेची २५ वर्षांपूर्वी थांबलेली धडधड पुन्हा सुरू होणार काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 11:01 AM2023-09-13T11:01:41+5:302023-09-13T11:02:03+5:30
ब्रिटिश काळात होता गाजावाजा : आता स्थानकांचेही खस्ता हाल
राजेश सोळंकी
आर्वी (वर्धा) : विदर्भामध्ये ब्रिटिशकाळात ‘शकुंतला’ ही रेल्वेगाडी प्रसिद्ध होती. या रेल्वेगाडीमुळे लहान व्यावसायिकांसह शेतकऱ्यांना मोठा आधार असल्याने ही शकुंतला लेकुरवाळी झाली. पण, कालौघात निम्न वर्धा प्रकल्पामुळे २५ वर्षांपासून या शुकंतलेचा संसारच मोडून पडला. परिणामी तिचे आश्रयस्थान असलेल्या स्थानकाचीही दुर्दशा झाली असून या शकुंतलेची धडधड पुन्हा सुरू व्हावी, याकरिता सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असून अद्याप यश आलेले नाही.
आर्वी हे सधन गाव असून परिसरात मोठ्या प्रमाणात कापूस, तेल, तुपासह इतरही उत्पादन व्हायचे. येथील कापूस विदेशात नेण्याकरिता ब्रिटिशांनी आर्वी ते पुलगाव ‘शकुंतला’ रेल्वेगाडी सुरू केली होती. क्लिक ॲण्ड निक्सन या ब्रिटिशकालीन कंपनीसोबत करार करून १६ एप्रिल १९१४ रोजी ही पहिली रेल्वे आर्वी ते पुलगावपर्यंत धावली. विकासाच्या दृष्टीने व औद्योगिक व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने आर्वी ते पुलगाव ही ३५ किमी.ची नॅरोगेज लाईन टाकण्यात आली होती.
आर्वी उपविभागात अनेक जिनिंग व प्रेसिंग असून आर्वी ही कापसाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. येथील रुई व गाठी विदेशात पाठविण्यासाठी या नॅरोगेज रेल्वेचा त्याकाळात वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता. मात्र, १९८२ पासून निम्न वर्धा प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली. २००६ मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला असून या धरणामुळे धनोडी बहादरपूरसह इतर गावातील रेल्वेचा रस्ताच गिळंकृत करून टाकला. त्यामुळे शकुंतला कायमचीच बंदिस्त झाली असून ती मुक्त व्हावी याकरिता शकुंतला मुक्ती मोर्चाची स्थापना करण्यात आली. विविध मोर्चे, आंदोलने आणि पत्रव्यवहारही झाला तरी शकुंतलेचा मार्ग मोकळा झालाच नाही.
असा होता शकुंतलेचा गोतावळा
आर्वी ते पुलगाव धावणाऱ्या या शकुंतला रेल्वे गाडीला सात डबे होते. दिवसातून दोनदा ये-जा करायची. आर्वीवरून निघाल्यानंतर खुबगाव, पाचेगाव, पारगोठाण, धनोडी, रोहणा, विरुळ, सोरटा व पुलगाव असा ३५ किलोमीटरचा प्रवास करायची. रेल्वे स्थानकाजवळच मोठे गोदाम बांधण्यात आले होते. तसेच रेल्वे मास्टर व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र निवासस्थानेही होती. पण, २५ वर्षांपासून याकडे दुर्लक्ष झाल्याने आर्वी शहरातील रेल्वेस्थानक, तिकीट घर, गोदाम, रेल्वे मास्टरचे व कर्मचाऱ्यांचे निवासस्थान पूर्णत: उद्ध्वस्त झाले आहे. या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे.
...तर दिल्लीपर्यंतचा प्रवास होऊ शकतो सुकर
पुलगाव-आर्वी-वरुड हा मार्ग पुढे नागपूर-आमला मार्ग व मुंबई-दिल्ली, कोलकाता या मार्गाला जोडला होता. कालांतराने रेल्वेचा विस्तार झाल्याने हा मार्ग मागे पडला. या परिसरातील या रेल्वे मार्गामुळे आर्वी, आष्टी, कारंजा, पुलगाव, रोहणा, पांढुर्णा, वरूड आदी तालुक्यातील ९०० गावांना या रेल्वेमार्गाचा लाभ होऊ शकतो. परंतु याकडे आजवर दुर्लक्ष झाल्याने ही मागणी प्रलंबित आहे. पुलगाव-आर्वी रेल्वे मार्ग ब्रॉडगेज करण्याबाबत मध्य रेल्वे विभागाचे मुख्य अभियंता यांनी निविदा सूचना जाहीर केली होती. त्यानंतर यावर कुठलीही कार्यवाही न झाल्याने हे काम रेंगाळले. पुलगाव-आर्वी या रेल्वेमार्गावर पुलाचे बांधकाम करण्याची मागणी आहे. मात्र निधीअभावी पुलाचे काम रखडले आहे. या रेल्वेमार्गाला आमलापर्यंत जोडल्यास दिल्ली मार्गे रेल्वे वाहतूक सुरू होऊ शकते, याची दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
लढा कायम राहणार
ब्रिटिशकालीन रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करून शकुंतला सुरू करावी. अन्यथा आगामी निवडणुकीत पुन्हा शकुंतलेच्या नावाचा गजर अटळ आहे. आर्वी-पुलगाव शकुंतला रेल्वे सुरू करण्यासाठी सतत शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. पुलगाव-आर्वी-वरूड हा रेल्वे मार्ग सुरू करण्यासाठी शकुंतला रेल्वे मुक्ती व विकास कृती समितीचे अध्यक्ष बाबासाहेब गळहाट यांच्या नेतृत्वाखाली धडपड सुरू होती. आता १०० किमी रेल्वे मिशन नावाने गौरव जाजू यांच्या नेतृत्वात आंदोलन कायम ठेवल्याने ब्रॉडगेज रूपांतर करून रेल्वे सुुरू करण्याकरिता खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत हा प्रश्न लावून धरला.
आता प्रतीक्षा शकुंतला रुळावर येण्याची
खासदार रामदास तडस, आर्वीचे आमदार दादाराव केचे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी व आर्वीचे भूमिपुत्र सुमीत वानखेडे यांच्या प्रयत्नाने आर्वी ते वरूडपर्यंत सर्व्हे करण्यात आला. निधीच्या मंजुरीचे प्रस्तावही हलविण्यात आले. त्यामुळे आर्वीकरांच्या आशा पल्लवीत झाल्या असून शकुंतला पुन्हा सुरू झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा संकल्पच १०० किमी रेल्वे मिशनचे गौरव जाजू व शकुंतला प्रेमींनी केला आहे.