वादळी वाऱ्याने घराची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 11:48 PM2019-05-26T23:48:56+5:302019-05-26T23:50:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क समुद्रपूर : अचानक आलेल्या जोरदार वाऱ्याने येथील वॉर्ड क्रमांक १५ मध्ये घराची पडझड झाली. यात घरात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : अचानक आलेल्या जोरदार वाऱ्याने येथील वॉर्ड क्रमांक १५ मध्ये घराची पडझड झाली. यात घरात विश्रांती घेत असलेले ११ जण जखमी, तर तीन गंभीर जखमी झाले. यात घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
२५ मे ला दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास दुपारच्या सुमारास अचानक जोराचा वारा सुरू झाला. वाºयामुळे वॉर्ड क्रमांक १५ मधील रहिवासी तानाजी चाफले यांच्या विटा टिनाच्या घराला लक्ष्य केले. पाहता-पाहता घरावरील टिनाचे छत उडत विटांच्या भिंती कोसळल्या. यावेळी घरात ६३ वर्षीय तानाजी चाफले, मनोहर तानाजी चाफले (३२), रेखा तानाजी चाफल (५९), ४ वर्षीय पूनम मनोहर चाफले, अक्षय चाफले (२१), हर्षल चाफले (१०), वंदना तुळशीराम वाणी (३६), १० वर्षीय वैभव तुळशीराम वाणी, सूरज वाणी (१६), मयूर गिरधर वाणी (१७), १६ वर्षीय माधुरी गिरधर वाणी हे सर्व घरात आराम करीत होते.
अचानक घर कोसळल्याने हे सर्व ११ जण जखमी झालेत. या विचित्र घटनेविषयी माहिती मिळताच स्थानिक संतोष कंगाले व राजू गोरखेडे यांनी चाफले यांचे घर गाठुन सर्वांना घराबाहेर काढत उपचारासाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यातील मनोहर चाफले, पूनम चाफले, सूरज वाणी हे गंभीर जखमी असून या तिघांना पुढील उपचाराकरिता सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या विचित्र घटनेत घरातील संपूर्ण साहित्य व घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच समुद्रपूर पोलिसांनी व नगरपंचात अध्यक्ष गजानन राऊत, गटनेते मधुकर कामडी यांनी घटनास्थळ व रुग्णालय गाठले. जखमींची विचारपूस केली. नैसर्गिक आपत्तीमुळे घर पडल्याने सोबतच साहित्याचेही नुकसान झाल्याने कुटुंबीय उघड्यावर आले असून आर्थिक मदत देण्याची मागणी शहरातील नागरिकांतून होत आहे.