बुद्धिमत्ता कुठे पण जन्माला येते
By admin | Published: April 22, 2017 02:40 AM2017-04-22T02:40:30+5:302017-04-22T02:40:30+5:30
ग्रामीण, आदिवासी, दुर्गम क्षेत्रातील कुटुंबात जन्मलेल्या बालकास शिक्षकांमुळे दर्जेदार शिक्षण व सकारात्मक दृष्टी
कल्याणकुमार डहाट : शिक्षक गुणगौरव सोहळा
गोंदिया : ग्रामीण, आदिवासी, दुर्गम क्षेत्रातील कुटुंबात जन्मलेल्या बालकास शिक्षकांमुळे दर्जेदार शिक्षण व सकारात्मक दृष्टी मिळून अध्ययन व अध्यापन सुकर झाल्यास सुजाण पिढी निर्माण होते. यातून आदर्श नागरिक, कर्तृत्ववान अधिकारी निर्माण होतात. म्हणजेच बुद्धिमत्ता कोणत्याही क्षेत्रातील कुटुंबात जन्म घेते, असे प्रतिपादन गोरेगावचे तहसील तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी केले.
सहयोग शिक्षक मंचच्यावतीने गोरेगावच्या शहीद जान्या-तिम्या विद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय शिक्षक गुणगौरव व निबंध, वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य एन.पी. शेख होते. अतिथी म्हणून गोरेगावचे पोलीस निरीक्षक सुरेश कदम, सहयोगचे प्रवर्तक आर.आर. अगडे, गटसमन्वयक एस.बी. खोब्रागडे, केंद्रप्रमुख एल.एफ.गिरेपुंजे, उपस्थित होते.
यावेळी ठाणेदार कदम यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत संस्कारक्षम घडविण्याचे आवाहन केले. मागील तीन वर्षांपासून सहयोग शिक्षक मंचतर्फे जिल्हास्तरीय उपक्रमशील पुरस्कार दिले जातात. शिक्षण व सामाजिक क्षेत्रात नैतिक जिम्मेदारी समजून उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना सन्मानित केले जाते. यामध्ये शाळेची गुणवत्ता व दर्जा, सामाजिक कार्य, यशस्वी विद्यार्थी, श्रमदान अशा निकषावर आधारीत प्रत्येक तालुक्यातून एका शिक्षकाची निवड केली जाते.
उपक्रमशील पुरस्कार २०१७ साठी यावर्षी डी.टी. कावळे आमगाव, पी.एस. विश्वकर्मा सालेकसा, एम.के. सयाम देवरी, डी.व्ही. टेटे गोरेगाव, विश्वजित मंडल अर्जुनी-मोरगाव, भाष्कर नागपुरे सडक-अर्जुनी, नरेंद्र गौतम तिरोडा, नितू डहाट गोंदिया या आठ जणांची निवड करण्यात आली.
सर्वांना स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र, ‘प्राथमिक शिक्षक कसा असावा’ पुस्तक, पुष्पगुच्छ देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रास्ताविक अध्यक्ष प्रमोदकुमार बघेले यांनी मांडले. मनोगत प्रवर्तक अगडे यांनी व्यक्त केले. संचालन युवराज बडे, श्रीकांत कामडी यांनी केले. आभार सुंदर साबळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी हेमराज शहारे, उपाध्यक्ष पुरुषोत्तम साकुरे, सचिव अशोक चेपटे, अरविंद कोटरंगे, शिवाजीराव बडे, सच्चिदानंद जिभकाटे, जि.पी. बिसेन, अनिल मेश्राम, विजेंद्र केवट, ताना डावकरे, किशोर गर्जे, मुकेशकुमार अडेल, विष्णु राऊत, जगदीश पडोळे, देवेंद्र धपाडे, वाय.बी. पटले, राहुल कळंबे, के.आर. भोयर, अर्चना चव्हाण यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)