14.30 कोटींच्या निधीतून 65 रस्ते होणार आता खड्डेमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2022 05:00 AM2022-06-20T05:00:00+5:302022-06-20T05:00:06+5:30
जिल्ह्यातील बहूतांश भागातील सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात आले आहे. परंतु, अजूनही अनेक रस्ते डांबर व गिट्टीची आहेत. याच रस्त्यांवर सध्या ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्यांना खड्डे चुकविण्यासाठी तारेवरची कसरतच करावी लागत आहे. नागरिकांसह वाहनचालकांची समस्या लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील खड्डेमय प्रमुख जिल्हा मार्ग तसेच राज्य मार्गांची निवड करीत ते खड्डेमुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पावसाळ्याच्या तोंडावर सार्वजनिक बांधकाम विभागाने विशेष उपक्रम हाती घेतला असून, या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ६५ रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येणार आहेत. यासाठी १४.३० कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे.
सध्या निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. जीवघेणे खड्डे बुजविण्यात येणाऱ्या रस्त्यांत १३ राज्य मार्ग, तर तब्बल ५२ प्रमुख जिल्हा मार्गांचा समावेश आहे. या कामासाठी संबंधितांकडून मंजुरी मिळाली असून, लवकरच निधीही प्राप्त होणार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यातील बहूतांश भागातील सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात आले आहे. परंतु, अजूनही अनेक रस्ते डांबर व गिट्टीची आहेत. याच रस्त्यांवर सध्या ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्यांना खड्डे चुकविण्यासाठी तारेवरची कसरतच करावी लागत आहे. नागरिकांसह वाहनचालकांची समस्या लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील खड्डेमय प्रमुख जिल्हा मार्ग तसेच राज्य मार्गांची निवड करीत ते खड्डेमुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचा मानस सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे. तसे प्रभावी नियोजनही करण्यात आले आहे.
मिळाली मंजुरी
- जिल्ह्यातील १३ राज्य मार्ग तसेच ५२ प्रमुख जिल्हा मार्गांवरील जीवघेणे खड्डे बुजविण्यासाठीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभाग, वर्धाच्या वतीने संबंधितांकडे पाठविण्यात आला होता. त्याला संबंधित अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे.
१३ राज्य मार्गांची लांबी तब्बल १०५ किमी
- खड्डेमुक्त होणाऱ्या मार्गामध्ये १३ राज्य मार्गांचा समावेश आहे. त्यासाठी २ कोटी ९० लाखांचा निधी खर्च केला जाणार आहे. हे १३ राज्य मार्ग १०५ किमीचे असून, काम पूर्ण झाल्यावर हे तेराही राज्य मार्ग वाहतुकीसाठी गुळगुळीत होणार आहेत.
५२ प्रमुख जिल्हा मार्ग ५७० किमीचे
- खड्डेमुक्त होणाऱ्या मार्गामध्ये ५२ प्रमुख जिल्हा मार्गांचा समावेश आहे. त्यासाठी ११ कोटी ४० लाखांचा निधी खर्च केला जाणार आहे. हे ५२ प्रमुख जिल्हा मार्ग ५७० किमीचे असून, लवकरच ते वाहतुकीसाठी गुळगुळीत होणार आहेत.
जिल्ह्यातील ६५ रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने विशेष उपक्रम हाती घेतला आहे. निवड करण्यात आलेल्या या रस्त्यांत १३ राज्य मार्ग, तर ५२ प्रमुख जिल्हा मार्गांचा समावेश आहे. एकूण १४.३० कोटींचा निधी खर्च करून रस्ते खड्डेमुक्त केले जाणार आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रत्यक्षात कामाला सुरूवात होणार आहे.
- प्रकाश बुब, कार्यकारी अभियंता, सा. बां. वि., वर्धा