१५ दिवसातच पडले भगदाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 11:45 PM2018-06-23T23:45:40+5:302018-06-23T23:47:10+5:30
शहरातील बॅचलर रस्त्याचे काम सुरू झाले त्या वेळेपासून तो वादात आहे. सध्या या रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यांचे बांधकाम सुरू आहे. काही भागात नाल्या बांधून त्यावर स्लॅब टाकण्यात आला; याला १५ दिवसांचा कालावधी झाला असून याच काळात या स्लॅबला भगदाड पडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील बॅचलर रस्त्याचे काम सुरू झाले त्या वेळेपासून तो वादात आहे. सध्या या रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यांचे बांधकाम सुरू आहे. काही भागात नाल्या बांधून त्यावर स्लॅब टाकण्यात आला; याला १५ दिवसांचा कालावधी झाला असून याच काळात या स्लॅबला भगदाड पडले आहे. यामुळे हा रस्ता आता सदोष कामाचे एक जिवंत उदाहरण ठरत आहे.
बांधकाम विभागामार्फत होत असलेल्या कामाचा दर्जा उत्तम असल्याचे शासनाच्यावतीने सांगण्यात येते. येथे मात्र त्याचे कुठेही दर्शन होत नाही. रस्त्याच्या कामाच्या प्रारंभीपासूनच नागरिकांच्या तक्रारी झाल्या आहेत. यात आमदारांकडूनही या रस्त्याची पाहणी करण्यात आली. त्यांनी मध्यंतरी या रस्त्याच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. शिवाय रस्त्याच्या कामाकरिता कंत्राटदाराला दंड ठोठावण्याची मागणी केली. नंतर हे प्रकरण शांत झाले.
सध्या या रस्त्याच्या शेजारी असलेल्या नाल्यांचे बांधकाम सुरू आहे. ते करताना नाल्यांच्या खाली साधे बेड कॉक्रीट ही टाकण्यात आले नसल्याचे या भागातील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. तशा तक्रारी बांधकाम विभागाकडे करण्यात आल्या आहेत. मात्र अधिकाऱ्यांकडून त्याची साधी पाहणीही करण्यात आली नाही. कालांतराने या नाल्या जमिनीत दबून साचलेल्या पाण्याचा नागरिकांना त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे बांधकाम विभागाने याची वेळीच दखल घेण्याची गरज आहे.
नाली बांधकाम करून नागरिकांना त्यांच्या घरासमोर या नालीवर स्लॅब टाकण्यात येत आहे. वर्धेचे नगराध्यक्ष यांच्या घरासमोर असलेल्या नालीवरही तसाच स्लॅब टाकण्यात आला. शनिवारी सकाळी या स्लॅबला अचानक भगदाड पडले. विशेष म्हणजे या कामाला केवळ १५ दिवसांचा कालावधी झाला आहे. एवढ्या कमी दिवसात अशी वेळ आल्याने या कामांचा दर्जा कसा असेल याचा अंदाज करणेही कठीण झाले आहे.
शहरात झालेली कामे कालांतराने नगर परिषदेला हस्तांतरीत करण्यात येणार आहे. मग अशी दर्जा नसलेली कामे त्यांच्या माथी मारल्यास त्याची डागडुजी करण्याची वेळ या यंत्रणेवर येणार आहे. यामुळे पालिकेने ही कामे हस्तांतरीत करताना काय करावे असा प्रश्न निर्माण होत आहे. शहरातील एका रस्त्याची नाही तर संपूर्ण कामांची हीच अवस्था आहे. यामुळे बांधकाम विभागाच्या कामांवर आता नागरिकांनी विश्वास ठेवावा अथवा नाही असा प्रश्न निर्माण झाला असून याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. मुख्यमंत्री, पालकमंत्री यांनी बांधकामाच्या दर्जाबाबत जाहीर वक्तव्य केले परंतु त्याचा परिणाम येथे दिसत नाही.
बांधकाम विभागाकडून कामांना मंजुरी मिळून निघताहेत देयके
शहरात विकास कामांच्या नावावर रस्ते आणि नाल्यांचीच कामे होत आहेत. केवळ एक बॅचलर रोड नाही तर शहरातील काही मोठ्या रस्त्यांची कामे जोरात सुरू आहे. असे असले तरी कामांच्या दर्जाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विकास कामांवर कोट्यवधी रुपचे खर्च होत असून यातून दर्जाहिन कामे होत असल्याचे दिसून आले आहे. याचा विचार होणे गरजेचे आहे. शहरात झालेल्या आणि सुरू असलेल्या प्रत्येक कामांच्या दर्जाची तपासणी वरिष्ठ पातळीवर करण्याची मागणी आता वर्धेकर नागरिकांकडून सुरू झाली आहे. या मागणीनुसार कार्यवाही गरजेची आहे.
शहरात भाजपा शासनाच्या काळात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. या कामांत रस्ते नाल्या, आदी कामांचा समावेश आहे. ही सर्व कामे नागरिकांकरिता आहे.पण बांधकाम विभागाच्यावतीने होत असलेल्या कामांचा दर्जा ढासळला जात आहे. अशी कामे पालिकेला हस्तांतरीत करण्यात येईल. मग पालिकेने काय याची डागडुजीच करावी काय, या कामांबाबात नागरिकांकडून अनेकवेळा तक्रारी झाल्या पण त्यावर कार्यवाही झाली नाही. बांधकाम विभाग आणि कंत्राटदाराला नेमके कोणाचे पाठबळ आहे. हे कळण्या पलिकडचे आहे.
- अतुल तराळे, नगराध्यक्ष वर्धा