एटीएम सुरक्षारक्षकाविनाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 12:56 AM2017-12-22T00:56:52+5:302017-12-22T00:58:54+5:30
बँकेत वाढत असलेली गर्दी कमी करण्याकरिता एटीएमची सुविधा अस्तित्वात आली. येथे नागरिकांना कोणत्याही क्षणी रक्कम काढणे सहज शक्य झाले. आता गावखेड्यातही एटीएमच पोहोचले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बँकेत वाढत असलेली गर्दी कमी करण्याकरिता एटीएमची सुविधा अस्तित्वात आली. येथे नागरिकांना कोणत्याही क्षणी रक्कम काढणे सहज शक्य झाले. आता गावखेड्यातही एटीएमच पोहोचले आहेत. नागरिकांना यातून सुविधा निर्माण झाली तरी हे एटीएम चोरट्यांकरिता नवा मार्ग देणारे ठरत आहेत.
असाच प्रकार नुकताच तुमसर येथे घडला. चोरट्यांनी गॅस कटरने एटीएम कापून रक्कम लांबविण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा रक्षक येथून बेपत्ता होता. वर्धेतही असा प्रकार होण्याची शक्यता आहे काय ? याची पाहणी करण्याकरिता वर्धेत गुरुवारी लोकमतच्यावतीने स्टींग आॅपरेशन करण्यात आले. यात वर्धेत असा प्रकार सहज शक्य असल्याचे दिसून आले. शहरातीलच नाही तर ग्रामीण भागातीलही एटीएमची सुरक्षा वाºयावच असल्याचे दिसून आले. जिल्ह्यात आठही तालक्यात विविध बँकेचे एकूण सुमारे २०० एटीएम आहेत. या एटीमची सुविधा नागरिकांना मिळत आहे. या एटीएममध्ये पैसे भरण्यापासून तर त्याच्या सुरक्षेची जबाबदारी एका विशिष्ट संस्थेकडे दिली आहे. त्याचा तसा कंत्राटच आहे. एटीएमवर बँकेच्या नावाचे फलक तेवढे दिसून आले आहे. वर्धा शहरातील मुख्य बाजारात असलेल्या एकूण १० एटीएमला लोकमतच्या चमूने भेट दिली. यापैकी मुख्य मार्गावरील दोन एटीएमवर सुरक्षा रक्षक दिसून आले. इतर ठिकाणी मात्र सुरक्षा रक्षक गैरहजरच होते. यामुळे भरदिवसा चोरची शक्यता नाकारता येत नाही.