पांदणमुक्तीविना ग्रामस्वच्छता नाही

By admin | Published: July 25, 2016 01:58 AM2016-07-25T01:58:56+5:302016-07-25T01:58:56+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेतील आदर्श गाव आणि संत गाडगेबाबा यांच्या ....

Without cleanliness, there is no cleanliness in the village | पांदणमुक्तीविना ग्रामस्वच्छता नाही

पांदणमुक्तीविना ग्रामस्वच्छता नाही

Next

अनुदानातही केली वाढ : गावांतील पांदण रस्त्याची पालटणार दशा
आष्टी (शहीद) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेतील आदर्श गाव आणि संत गाडगेबाबा यांच्या संकल्पनेतील संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविले जात आहे. या योजनांसाठी प्रत्येक गाव आधी पांदणमुक्त करावे लागणार आहे. तोपर्यंत योजनेत समावेश होणार नाही, असा आदेश राज्य शासनाने काढला आहे. यातून गावातील पांदण रस्ते विकासाची वाट मोकळी झाली आहे. शिवाय योजनेचे अनुदानही वाढवून देण्यात आले आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे आष्टी तालुक्यातील अनेक गावातील पांदण रस्ते विकसित होण्यासाठी मदत होणार आहे. यासाठी ग्रामपंचायतीला १४ व्या वित्त आयोगातून खर्च करता येणार आहे. मागील वर्षी राज्य शासनाने ग्रामस्वच्छता अभियानाला तात्पुरती स्थगिती देऊन गाव विकासासाठी परिश्रम घेणाऱ्या गावकरी तथा ग्रामसेवकांचा हिरमोड केला होता. अनेक गावांतील सरपंचांनी जिल्हा परिषदेमार्फत राज्य शासनाला जाब विचारला होता. यावर मंत्रीमंडळ स्तरावर झालेल्या चर्चेनुसार येत्या २ आॅक्टोबरपासून अभियानाची सुरूवात करण्यात येणार आहे. यासाठी विविध पातळीवरून मूल्यमापन होणार आहे.
मुख्य संसाधन केंद्र यांच्याकडून गावातील सर्व बाबींची तपासणी होणार आहे. यानंतरच ग्रामस्वच्छता अभियानात गावाचा समावेश होणार की नाही, याचा निर्णय घेतला जाणार आहे. यामुळे शासकीय योजना कटाक्षाने राबविल्या जाणार असल्याचे दिसून येते. गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी शासनाने प्रती शौचालय १२ हजार रुपये अनुदान जाहीर केले आहे. नागरिकांनी खड्डा खोदून द्यायचा असून उर्वरित सर्व खर्च शासनाकडून केला जात आहे. एवढी सुविधा देऊनही काही गावांतील नागरिक आडकाठी आणत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी गावातील राजकारण आडवे येत आहे.
गाव शिवारातील अनेक पांदण रस्ते अतिक्रमणाने घेरले गेले आहेत. शेतकरी धुऱ्यावर अतिक्रमण करून बसल्याने पांदण रस्ते दिसत नाहीत. ग्रामपंचायत पातळीवर मोजमाप करून देण्यासाठी पैसे भरावे लागत आहेत. अनेक ग्रामपंचायतींची स्थिती जेमतेम असून कराचा पैसा वसूल झाला नाही. अशा स्थितीत गावातील पांदण रस्ते मोकळे झाले नाही; पण शासनाने नवीन अट घातल्याने याबाबत दक्षता घ्यावी लागणार आहे. आष्टी तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींपैकी १८ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त गावामध्ये १०० टक्के पात्र ठरल्या आहेत. उर्वरित ठिकाणी शौचालयांचे बांधकाम झपाट्याने सुरू आहे. हागणदारी मुक्तीनंतर आता शासनाने ग्रामस्वच्छता अभियानासाठी पांदण मुक्ती करण्यावर भर दिला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे गावांतील पांदण रस्त्यांचे रूप पालटणार, असेच दिसते.(तालुका प्रतिनिधी)

पुरस्काराच्या रकमेतही केली वाढ
ग्रामस्वच्छता अभियान राबवित असताना शासनाकडून पुरस्कार दिले जात होते. या पुरस्कारांच्या रकमेतही आता वाढ करण्यात आली आहे. यात तालुका पातळीवर प्रथम क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतीला पूर्वी २५ हजार, द्वितीय १५ हजार तृतीय १० हजार अशी रक्कम दिली जात होती. आता प्रथम पुरस्कार एक लाख रुपये, द्वितीय ५० हजार रुपये तर तृतीय २५ हजार रुपये पुरस्कार देण्यात येणार आहे. तेवढ्या तीव्रतेने गावांतील कामेही करावी लागणार आहेत. शिवाय पांदण रस्त्यांची अट घातल्याने आता गावाच्या स्वच्छतेसह पांदण रस्त्यांची दशाही पालटणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

 

Web Title: Without cleanliness, there is no cleanliness in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.