पालिकेचे उत्पन्न वाढल्याशिवाय विकास अशक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 11:51 PM2017-10-23T23:51:12+5:302017-10-23T23:51:31+5:30
नगर पालिकेचे उत्पन्न वाढविल्याशिवाय विकास साधता येणार नाही. सुशिक्षित बेरोजगारांना काम देता येणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : नगर पालिकेचे उत्पन्न वाढविल्याशिवाय विकास साधता येणार नाही. सुशिक्षित बेरोजगारांना काम देता येणार नाही. यामुळे उत्पन्न वाढीसाठी नगर परिषदेने वेगवेगळी विकास कामे हाती घेतली पाहिजे, असे मत व्यक्त करीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वच्छ व सुंदर शहरासाठी शुभेच्छा दिल्या.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या वास्तूचा लोकार्पण सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. न.प. द्वारे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. रामदास तडस तर अतिथी म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे माजी खासदार सुरेश वाघमारे, नगराध्यक्ष सुचिता मडावी, न.प. उपाध्यक्ष प्रा.डॉ. नरेंद्र मदनकर, जि.प. सभापती मुकेश भिसे, गटनेत्या शोभा तडस, न.प. पदाधिकारी उपस्थित होते. सर्वप्रथम ना. गडकरी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला हारार्पण करण्यात आले. यानंतर शिलान्यास केला.
प्रास्ताविकातून खा. तडस यांनी शहराच्या सर्वांगिण विकासाची हमी दिली. या न.प. ला दीडशे वर्षांचा इतिहास असल्याने केंद्र सरकारच्या अधिकाधिक योजना येथे कार्यान्वित व्हाव्या, अशी अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी ना. गडकरी यांचा पालिकेतर्फे श्रीफळ, गणेश मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. वर्धा-यवतमाळ मार्गावर न.प. द्वारे २.३२ कोटी खर्चातून बांधलेल्या वास्तूमध्ये ५६ गाळे आहे. पैकी ६ गाळ्यांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत सुसज्ज वाचनालयाची व्यवस्था आहे. उर्वरित गाळे लिलाव पद्धतीने दिले. दर्शनी भागात सौंदर्यीकरणास वाव आहे. यावेळी तालुक्यातील भाजपच्या नवनिर्वाचित सरपंचांचा ना. गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन प्रा. पंकज चोरे यांनी केले. यावेळी पं.स. सभापती विद्या भुजाडे, न.प. सभापती सारिका लाकडे, कल्पना ढोक, सुनीता बकाणे, सुनीता ताडाम आदी उपस्थित होते.