गांधी आश्रमातील आदी निवास ‘चले जाव’चा साक्षीदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2021 05:00 AM2021-08-09T05:00:00+5:302021-08-09T05:00:17+5:30
इतिहासात ९ ऑगस्ट १९४२ या दिवसाला एक वेगळे महत्त्व आहे. याच दिवशी मु़ंबईच्या गवालिया टँक आझाद मैदानावर काँग्रेसच्यावतीने इंग्रजांच्या विरोधात चले जावची घोषणा करण्यात आली. ब्रिटिशांनी हा देश सोडून चालते व्हा असा इशारा देण्यात आला. वर्धा येथे १४ जुलै १९४२ कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. आश्रमातील आदी निवासात पार पडलेल्या या बैठकीतच ठरावाचा मसुदा तयार करण्यात आला.
दिलीप चव्हाण
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात मोठे जनआंदोलन म्हणजे ‘भारत छोडो’ आंदोलन. याच आंदोलनाचा एल्गार पुकारताना महात्मा गांधी यांनी ‘चले जाव’चा नारा दिला. या ठरावाचा मसुदा आणि बैठक महात्मा गांधीजींच्या सेवाग्राम येथील आश्रमातील आदी निवास मध्ये झाली. हे आदी निवास आजही ‘चले जाव’ चा साक्षीदार आहे. यंदाचे वर्ष स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे वर्ष असून चले जावो या आंदोलनाला यंदा ७९ वर्षे पूर्ण झाली. इतिहासात ९ ऑगस्ट १९४२ या दिवसाला एक वेगळे महत्त्व आहे. याच दिवशी मु़ंबईच्या गवालिया टँक आझाद मैदानावर काँग्रेसच्यावतीने इंग्रजांच्या विरोधात चले जावची घोषणा करण्यात आली. ब्रिटिशांनी हा देश सोडून चालते व्हा असा इशारा देण्यात आला. वर्धा येथे १४ जुलै १९४२ कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. आश्रमातील आदी निवासात पार पडलेल्या या बैठकीतच ठरावाचा मसुदा तयार करण्यात आला.
अन् सेवाग्राम येथील ठराव पोहोचला मुंबईत
सेवाग्राम येथील आश्रमातूनच गांधीजी, कस्तुरबा, महादेवभाई देसाई, मीरा बहन, डॉ. सुशिला नायर आणि अन्य सहकारी मुंबईत दिनांक ७ व ८ ऑगस्ट १९४२ च्या बैठकीसाठी रवाना झाले. काँग्रेस कार्यकारणी समितीच्या बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर ८ ऑगस्टला त्यावर गवालिया टँक मैदानावर जाहीर सभेत शिक्कामोर्तब झाले. याच ठिकाणी गांधीजींनी आजपासून आपण स्वतंत्र झालो असे समजा, असे सांगत इंग्रजांविरुद्ध चले जावचा नारा बुलंद केला. त्यानंतर ९ ऑगस्ट १९४२ ला भारत छोडोचे आंदोलन देशभरात सुरू झाले. इंग्रजांनीही आंदोलन दडपण्यासाठी गांधीजीसह अन्य प्रमुख राष्ट्रीय नेते व सहकाऱ्यांना अटक केली. त्यामुळे ९ ऑगस्ट हा दिवस भारतीय इतिहासात क्रांतिदिवस म्हणून सूवर्ण अक्षरात नोंदविण्यात आला आहे.
व्यापारी म्हणून आले अन राज्यकर्ते झाले
- व्यापारी म्हणून आलेल्या इंग्रजांनी भारतावर तब्बल दीडशे वर्षे राज्य केले. भारतीयांना त्यांच्याकडून गुलामागत वागणूक दिली जायची. भारतातील संपत्ती आणि कच्चा माल थेट आपल्या देशात नेऊन इंग्रजांनी एकप्रकारे भारतीयांची लूटच केली. इंग्रजांकडून अन्याय-अत्याचार केले जात असतानाच गांधीजींनी भारत भ्रमण करून अहिंसक मार्गाने आणि स्वावलंबन, ग्रामोत्थान, सूतकताई, शिक्षण आदी काम सुरू केले. सुरुवात सेवाग्राम आश्रम आणि हिंदुस्थानी तालिमी संघ,चरखा संघ तसेच जवळ्पास सुरू करण्यात आलेल्या रचनात्मक कार्य करणाऱ्या संस्थाच्या निर्माणातून आश्रम बनले. देशासाठी कार्यकर्ता घडविण्याचे केंद्र सेवाग्राम बनले. गांधी विचार रुजविणारी पहिला शाळा सेवाग्राम येथेच नावरुपास आली.
अनेकांशी केली चर्चा
ब्रिटिशांना अखेरचा निर्वाणीचा इशारा देण्यासाठी काय शब्द असावा याबाबत गांधीजींनी अनेकांशी चर्चा केली. गेट आऊट, रिट्रीट इंडिया, विथड्रा इंडिया असे शब्दप्रयोग बापूंनी नाकारले. याच दरम्यान युसूफ मेहर अली यांनी क्विट इंडिया हा शब्दप्रयोग सुचविला. याला तात्काळ गांधीजींनी मान्यता दिली. पुढे चले जाव व भारत छोडो या घोषणांनी जनमानसाच्या मनावर पकड निर्माण केली.
ती चार भाषण ठरली परिणामकारक
८ ऑगस्टला ऐतिहासिक चार भाषणे झाली. काँग्रेसच्या अध्यक्षपदावर मौलाना अबुल कलाम आझाद होते. त्यांचे भाषण पहिले झाले. पं. जवाहरलाल नेहरू यांनी कार्यकारिणीच्या सभेत ठराव वाचून दाखविला आणि ठरावाचे समर्थन करणारे भाषण केले. ठरावाला अनुमोदन देणारे भाषण सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. हा ठराव सभेने मंजूर करावा याचे प्रास्ताविक भाषण केले. गांधीजींनी हिंदी व इंग्रजीतून आपले विचार मांडणारे भाषण दिले. हे भाषण सव्वादोन तास चालले.