जीवनदायी अजस्त्र वृक्षांवर वाळवीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 11:36 PM2018-04-01T23:36:42+5:302018-04-01T23:36:42+5:30
शीतल छाया देणाऱ्या अजस्त्र झाडांवर सध्या वाळवीचे संकट निर्माण झाल्याने झाडे धोक्यात आली आहे. या झाडांना वाळवीमुक्त करण्याचा प्रयत्न होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : शीतल छाया देणाऱ्या अजस्त्र झाडांवर सध्या वाळवीचे संकट निर्माण झाल्याने झाडे धोक्यात आली आहे. या झाडांना वाळवीमुक्त करण्याचा प्रयत्न होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रस्त्याच्या दुतर्फा, शेतशिवारात आजही मोठ्या प्रमाणात देशी आणि बहुगुणी झाडे आहेत. या झाडांमुळे ही जीवनसृष्टी सजीव असल्याचे दिसते. झाडांचे महत्त्व संत महात्म्यांपासून तर पर्यारणातज्ञांनी सांगितले आहे. पंजोबा, आजोबा, वडिलांनी लावलेली झाडे विस्तीर्ण वाढून आज शीतल छाया, शुद्ध हवा, फळे, लाकडे आदी देत आहेत. शासनदेखील रोडच्या दुतर्फा असलेल्या झाडांना पूर्वी चुना आणि गेरू मारून संरक्षण देत होते. ही रंगविलेली झाडे रात्री वाहन चालकांना सावधान करण्याचे काम करीत होती. ती शेतकरी वाटसरू व गुरांसाठी विश्रामाची हक्काची जागा होती. आता विकासाच्या नादात या अजस्त्र झाडांची कत्तल केली जात आहे.
वृक्षांचे महत्त्व पटल्याने झाडे लावण्यावर भर दिला जात आहे; पण त्या झाडांकडे लक्ष दिले जात असल्याचे दिसत नाही. वास्तविक, जुनी झाडे वाचविणे व त्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. सध्या सेवाग्राम, वर्धा, कांढळी, नागपूर, जाम आदी मार्गांवरील झाडांना वाळवी लागल्याचे दिसून येत आहे. यामुळे बहुमूल्य झाडे वाळत आहे. यात कडूनिंब, आंबा या झाडांचा समावेश आहे. वाळवी जमिनीपासून झाडांना लागते. हळूहळू संपूर्ण झाड काबीज करून झाड वाळते. चुना व गेरू मारल्यास झाडांना वाळवी लागत नाही व आयुष्यही वाढते. वाळवी लागलेली झाडे शाबूत ठेवण्याकरिता तथा त्यांचे संगोपन करण्यासाठी शासन व सामाजिक स्तरावर कार्यवाही करणे गरजेचे आहे.
प्रत्येक वर्षी शासनाकडून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड मोहीम राबविली जाते. यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. आता वृक्षांच्या संरक्षणावरही खर्च केला जात आहे; पण जुन्या झाडांच्या संगोपानाकडे कुणाचेच लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. रस्त्यांच्या कामांसाठी अजस्त्र वृक्ष कापले जात आहे. यावर तोडगा काढत झाडे न कापता विकास कामे करणे तथा वृक्षांचे संरक्षण करणे गरजेचे झाले आहे.
या करता येतात उपाययोजना
वाळवी लागलेल्या वृक्षांचे संगोपन, संरक्षण करण्याकरिता अनेक उपाययोजना केल्या जातात. काही ठिकाणी मीठ, कडूनिंबाच्या बिया, मोरचूद, शेण, गोमुत्र आदींचे वेगवेगळे द्रावण तयार करून ते झाडांवर शिंपडले जाते. याचा वाळवी लागलेल्या वृक्षांना फायदा होतो. शिवाय परसबाग तसेच काही वृक्षप्रेमी मीट व मिठाच्या द्रावणाचा उपयोग करतात, अशी माहिती आहे. महात्मा गांधी आश्रमातील गांधीजींनी लावलेल्या पिंपळाच्या झाडाला किडे लागले होते. त्यावरही सदर प्रयोग करण्यात आला असून तो यशस्वी झाला. शासन, सामाजिक संस्थांनी या दृष्टीने उपाययोजना करणे अगत्याचे झाले आहे.