महिलेने दिला तीन मुलांना जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 11:01 PM2018-09-03T23:01:52+5:302018-09-03T23:02:16+5:30
एका महिलेने एकाच वेळी दोन मुलांना जन्म देणे हा विषय सध्याच्या विज्ञान युगात नागरिकांसाठी आश्चर्याचा धक्का देणारा राहिलेला नाही. असे असले तरी जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी एका महिलेने तीन मुलांना जन्म दिला असून त्या मातेसह बाळांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : एका महिलेने एकाच वेळी दोन मुलांना जन्म देणे हा विषय सध्याच्या विज्ञान युगात नागरिकांसाठी आश्चर्याचा धक्का देणारा राहिलेला नाही. असे असले तरी जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी एका महिलेने तीन मुलांना जन्म दिला असून त्या मातेसह बाळांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले. ही या रुग्णालयातील पहिलीच घटना असल्याने सदर विषय रुग्णालयात चांगलाच चर्चीला जात आहे.
स्थानिक पुलफैल येथील इना शेख कैश इस्माईल शेख नामक महिलेला प्रसूतीसाठी शनिवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर महिलेला रुग्णालयात दाखल करताच तिला प्रसूतीकळा सुरू झाल्या. त्या महिलेने त्याच दिवशी सकाळी ११.५२ वाजता १.२ किलो, ११.५८ वाजता ०.९५० किलो व दुपारी १२ वाजता ०.९८० किलो वजनाच्या तीन मुलांना जन्म दिला. नुकतेच जन्मलेल्या तीन मुलांपैकी दोन मुलांचे वजन थोडे कमी असल्याने डॉक्टरांच्या निदर्शनास येताच या मातेसह तिच्या तिनही मुलांची विशेष काळजी रुग्णालय प्रशासनाच्यावतीने घेण्यात आली. रविवारी या तिनही नवजात बालकांची शुगर वाढत असल्याचे व त्यांची प्रकृती खालावत असल्याचे निदर्शनास येताच सदर मातेसह तिच्या तिनही मुलांना सेवाग्रामच्या कस्तूरबा रुग्णालयात हलविले, असे जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरांनी सांगितले. सदर महिलेची प्रसूती योग्य पद्धतीने व्हावी तसेच नुकत्याच जन्मलेल्या तिनही मुलांना योग्य आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक पुरुषोत्तम मडावी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक अनुपम हिवलेकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसूती विभाग प्रमुख डॉ. मनिषा नासरे, डॉ. प्राजक्ता चिंदालोरे, डॉ. सोनी सिंग, डॉ. मारीया खातून, डॉ. प्रियंका तळवेकर, बालरोग तज्ज्ञ डॉ. संजय गाठे, डॉ. अमोल येळणे आदींनी विशेष प्रयत्न केले.
रुग्णांचा विश्वास हीच आमची शक्ती
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न केला जातो. येथे कार्यरत डॉक्टरांवर नागरिकांचा विश्वास वाढत असल्याने दिवसेंदिवस येथील रुग्ण संख्येतही वाढ होत आहे. नागरिकांचा विश्वास हिच आमची शक्ती असून हा त्यांचा आमच्यावरील विश्वास आम्हाला नव्या जोमाने काम करण्यास प्रेरणा देत असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.
इना शेख कैश इस्माईल शेख नामक महिला प्रसुतीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाली होती. तिने येथे तिळ्या मुलांना जन्म दिला. नवजात बालक हे सुरूवातीला २४ तास अगदी व्यवस्थित होते. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांची विशेष काळजी घेण्यासाठी त्यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मातेचे व मुलांचे आरोग्य व्यवस्थित आहे.
- डॉ. अनुपम हिवलेकर, अति. जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.