‘त्या’ महिलेचे घटनास्थळीच झाले शवविच्छेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 10:04 PM2019-06-23T22:04:24+5:302019-06-23T22:04:43+5:30
आष्टी-मोर्शी मार्गावरील अप्पर वर्धा धरणालगतच्या जोलवाडी जंगल शिवारात महिलेचा कुजलेल्या व अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात विविध तर्कवितर्क लावले जात आहे. सदर मृतदेहाचे शवविच्छेदन वैद्यकीय तज्ज्ञाना पाचारण करून घटनास्थळीच करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : आष्टी-मोर्शी मार्गावरील अप्पर वर्धा धरणालगतच्या जोलवाडी जंगल शिवारात महिलेचा कुजलेल्या व अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात विविध तर्कवितर्क लावले जात आहे. सदर मृतदेहाचे शवविच्छेदन वैद्यकीय तज्ज्ञाना पाचारण करून घटनास्थळीच करण्यात आले आहे. शिवाय तिची ओळख पटविण्यासाठी आष्टी पोलिसांची दोन चमू रवाना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, शवविच्छेदन झाल्यानंतर महिलेचा मृतदेह धरणाच्या परिसरात पुरविण्यात आला आहे. शिवाय घेण्यात आलेले नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अधिकची माहिती पोलिसांना मिळणार आहे.
साहूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गावंडे यांनी शवविच्छेदन केले. मृत महिला ही २५ ते ३० वर्षावयोगटातील असून तिच्या डाव्या हातामधील कंंगन पूर्ण जळाल्याचे आणि उजव्या हातामधील कंगन जसेच्या तसे असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. तसेच मृत महिला विवाहिता असावी असा भास निर्माण करण्यासाठीही आरोपीने तिच्या गळ्यात मंगळसूत्र टाकल्याचे निदर्शनास आले आहे. ते साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. सदर महिलेचा मृत्यू अनैतिक संबंधातून तसेच तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा संशयही सध्या पोलिसांकडून वर्तविला जात आहे.
परंतु, मृत महिलेची ओळख पटल्यावरच अधिकची माहिती पुढे येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. रविवारी आष्टी पोलिसाच्या दोन चमू वरुड, मोर्शी, तिवसा, जलालखेडा पोलीस ठाण्याकडे रवाना झाल्या आहेत. या दोन्ही चमू सदर महिलेची ओळख पटविण्यासह अधिकची गोपनीय माहिती गोळा करणार आहे. सदर पोलीस कर्मचाऱ्यांच्या हाती काय लागले हे या दोन्ही चमू परतल्यावर पुढे येणार आहे. पुढील तपास ठाणेदार जीतेंद्र चांदे, पोलीस उपनिरीक्षक राजू दहिलेकर, राहुल तेलंग, निलेश वंजारी, मंगेश भगत, बाबा गवई करीत आहेत.
रुमाल ठरतोय शंका निर्माण करणारा
सदर महिलेसोबत फार मोठे कृत्य करुन पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तिला जाळले असावे, असा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे. परंतु, तिची ओळख पटल्यावर तसेच शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावरच अधिकची माहिती पोलिसांना मिळणार आहे. विशेष म्हणजे, मृत महिलेच्या तोंडात रुमाल होता. तो रुमाल सध्या अनेक शंका निर्माण करीत आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी श्वानपथक मदतगार ठरले असते, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु, घटनास्थळी श्वानपथकाला पाचारणच करण्यात आले नव्हते. शिवाय त्याची गरज नव्हती, असे पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. पुढे हे प्रकरण कुठले नवीन वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.