चाकूने वार करून महिलेची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 11:45 PM2019-02-17T23:45:03+5:302019-02-17T23:46:00+5:30
मुलीला पळवून नेल्याचा राग मनात बाळगुन तिघांनी संगणमत करीत एका ५० वर्षीय महिलेची चाकूने मारहाण करून हत्या केली. ही घटना आर्वी तालुक्यातील पिपरी (भाईपूर) पुनर्वसन येथे शनिवारी सायंकाळी उशीरा घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : मुलीला पळवून नेल्याचा राग मनात बाळगुन तिघांनी संगणमत करीत एका ५० वर्षीय महिलेची चाकूने मारहाण करून हत्या केली. ही घटना आर्वी तालुक्यातील पिपरी (भाईपूर) पुनर्वसन येथे शनिवारी सायंकाळी उशीरा घडली. बेबी लक्ष्मण मेंढे रा. कवडगव्हाण ता. तिवसा, जि. अमरावती, ह.मु. पिपरी (भाईपूर) पुनर्वसन, असे मृतक महिलेचे नाव असून या प्रकणातील तिनही आरोपींना आर्वी पोलिसांनी अटक केली आहे. उमेश काळे, गणेश काळे व ऋषिकेश वडतकर असे अटक केलेल्या आरोपींचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस सूत्रानुसार, गणेश काळे याच्या मुलीला मृतक बेबी मेंढे याच्या मुलाने पळवून नेल्याचा ठपका ठेवून त्याच विषयाला अनुसरून वारंवार बेबी मेंढे यांच्याकडे विचारणा करण्यात आली. परंतु, त्यांच्याकडून पाहिजे तसा प्रतिसाद न मिळत असल्याचा राग मनात धरून एकतर तिच्याकडून माहिती घ्यायची अन्यथा तिला जीवानिशीच संपवायचे असे संगणमत करून आरोपी उमेश काळे, गणेश काळे व ऋषिकेश वडतकर यांनी बेबी मेंढे यांच्या घरात प्रवेश केला. सुरूवातीला शाब्दिक चकमक उडाल्यानंतर आरोपींनी सोबत आणलेल्या चाकूने बेबीला मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या बेबी मेंढे यांना अमरावती येथील रुग्णालयात येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती आर्वी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी तेजस मेंढे याच्या तक्रारीवरून आर्वी पोलीस ठाण्यात भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपी उमेश काळे, गणेश काळे व ऋषिकेश वडतकर यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास आर्वी पोलीस करीत आहे.
आरोपी अन् मृत पूर्वी राहायचे एकाच गावात
मृतक बेबी मेंढे या अमरावती जिल्ह्यातील कवडगव्हाण येथील मुळ रहिवासी आहेत. वाद होऊ नये म्हणून त्या मागील काही महिन्यांपासून पिपरी भाईपूर पुनर्वसन येथील कृष्णराव देवकाते यांच्या घरी किरायाणे राहत होत्या.
सदर प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या तीन आरोपींपैकी उमेश काळे आणि गणेश काळे हे अमरावती जिल्ह्यातील कवडगव्हाण येथील तर ऋषिकेश वडतकर हा मोझरी येथील रहिवासी आहे. काळे आणि मेंढे परिवार पूर्वी एकाच गावात रहात होता, असे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.