डॉक्टरच्या चुकीच्या उपचारामुळे महिला दगावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 10:20 PM2019-07-28T22:20:10+5:302019-07-28T22:21:08+5:30
स्थानिक ठाकरेपुरा येथील खासगी डॉ. सुरेश गाडेकर यांच्या चुकीच्या उपचारामुळे महिला दगावल्याचा आरोप करून परिसरातील संतप्त नागरिकांनी आणि मृताच्या कुटुंबीयांनी मृतदेह थेट पोलीस कचेरीत नेला. संतप्त नागरिकांनी सदर डॉक्टरावर कठोर कारवाईच्या मागणीसाठी पोलीस कचेरीत ठिय्या दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : स्थानिक ठाकरेपुरा येथील खासगी डॉ. सुरेश गाडेकर यांच्या चुकीच्या उपचारामुळे महिला दगावल्याचा आरोप करून परिसरातील संतप्त नागरिकांनी आणि मृताच्या कुटुंबीयांनी मृतदेह थेट पोलीस कचेरीत नेला. संतप्त नागरिकांनी सदर डॉक्टरावर कठोर कारवाईच्या मागणीसाठी पोलीस कचेरीत ठिय्या दिला.
ठाकरेपुरा येथील लिला उगेमुगे (७०) ही महिला उपचार घेण्यासाठी डॉ. सुरेश गाडेकर यांच्याकडे गेली होती. उपचारादरम्यान डॉक्टरांनी सदर महिलेला दोन इंन्जेक्शन दिले. तसेच खाण्यासाठी खुल्या गोळ्यांची भुकटी आणि जवळच्या काही गोळ्या दिल्या. उपचारानंतर ही महिला घरी परत आली असता अवघ्या दहा ते पंधरा मिनिटाचे अवधीत तिची प्रकृती खालवली. घाबरलेल्या कुटुंबियांनी याबाबतची माहिती संबंधीत डॉक्टरला देवून तपासणी केली असता ही महिला हृदयविकाराच्या धक्क्याने दगावल्याचे सांगण्यात आले. याबाबतची कुणकुण परिसरातील नगरिकांना लागली असता त्यांनी सदर डॉक्टरच्या दवाखान्यासमोर व मृतकाचे घरासमोर एकच गर्दी केली. शिवाय डॉक्टरांच्या कार्यप्रणालीवर शंका उपस्थित केली. यापूर्वी अशा प्रकारच्या काही घटना या डॉक्टराच्या हाताने झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी खा. रामदास तडस तसेच नगरसेवक नंदू वैद्य यांनी केली आहे.
दर्शनीय फलकावर शिक्षणाचा उल्लेख नाही
लकवा आजारावर हमखास इलाज करण्याची या डॉक्टराची ख्याती राहिली आहे. त्यामुळे शंभर ते दीडशे कि़मी. अंतरापासूनच्या रुग्णांची याठिकाणी गर्दी राहते. असे असले तरी दवाखान्याच्या दर्शनीय भागात लावण्यात ंआलेल्या फलकावर डॉक्टरांनी कुठले कुठले शिक्षण घेतले याचा उल्लेखच नाही, असाही आरोप यावेळी करण्यात आला.
औषधांसह काही कागदपत्रे केली जप्त
याबाबतची तक्रार शनिवारी रात्री पोलिसात देण्यात आली. याप्रकरणी देवळी पोलिसांनी आकस्किम मृत्यूची नोंद घेतली आहे. पोलिसांनी तक्रार प्राप्त होताच सदर डॉक्टरच्या न.प. ले-आऊट येथील राहते घराची तसेच ठाकरेपुरा येथील खासगी दवाखान्याची झडती घेतली. तेथून इंन्जेक्शन व औषधीचे काही नमुने तसेच डॉक्टरकडे असलेली डिग्री संबंधीचे कागदपत्रे ताब्यात घेतली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर आणि उपनिरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनात देवळी पोलिसांनी केली.
सदर डॉक्टरने उपचारासाठी वापरलेली औषधी, इंन्जेक्शन तसेच बाळगलेली डिग्री ताब्यात घेण्यात आली आहे. संबंधीत औषधी व प्राप्त होणारा शवविच्छेदनाचा अहवाल तज्ज्ञांसह मेडीकल बोर्डकडे पाठवण्यात येईल. शिवाय त्यानुसार गुन्ह्याचे स्वरूप ठरवून पुढील कारवाई करण्यात येईल.
- नितीन लेव्हरकर, ठाणेदार, देवळी.