वायफडच्या दारुबंदीसाठी महिलेने चौकातच विकली दारु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 06:00 AM2020-02-21T06:00:00+5:302020-02-21T06:01:02+5:30
जिल्ह्यात दारुबंदी केवळ कागदोपत्रीच राहिली आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दारुचे पाट वाहत असून पोलिसांकडूनही कारवाईसाठी चालढकल केली जाते. वायफड येथेही काही दिवसांपासून अशीच परिस्थिती असल्याने घरातील कर्ता पुरुष आणि मुलगाही दारुच्या व्यसनी लागले आहे. परिणामी घरातील महिलांना कुटुंबाचा सांभाळ करताना अडचणी निर्माण होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : तालुक्यातील वायफड या गावात मोठ्या प्रमाणात दारुविक्री होत असल्याने अनेकांच्या संसारामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. याचा सर्वाधिक त्रास महिलांना सहन करावा लागत आहे. वारंवार मागणी करुनही गावातील दारुबंदी होत नसल्याने त्रस्त झालेल्या एका महिलेने गावातील भरचौकात प्रतिकात्मक दारुविक्री आंदोलन करुन जशास तसे उत्तर दिले. त्यामुळे पोलिसांनीही गावाकडे धाव घेऊन गावातील दारुबंदी करण्याचे आश्वासन दिले.
जिल्ह्यात दारुबंदी केवळ कागदोपत्रीच राहिली आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दारुचे पाट वाहत असून पोलिसांकडूनही कारवाईसाठी चालढकल केली जाते. वायफड येथेही काही दिवसांपासून अशीच परिस्थिती असल्याने घरातील कर्ता पुरुष आणि मुलगाही दारुच्या व्यसनी लागले आहे. परिणामी घरातील महिलांना कुटुंबाचा सांभाळ करताना अडचणी निर्माण होत आहे. दिवसभर मोलमजुरी करुन थकल्यावर घरी आल्यानंतर पती व मुलांकडूनही त्रास दिल्या जात असल्याने आशाबाई आनंदराव उघडे यांनी गावातील दारुविक्रेत्यांना दारुविक्री बंद करण्याची विनंती केली.
तरीही दारुविक्री बंद न झाल्याने आशाबाईनी जशास तसे उत्तर देण्यासाठी गावातील चौकातच प्रतिकात्मक दारुविक्री आंदोलन करुन ‘आधी गावातील दारुबंदी करा अन्यथा मी येथेच दारुविक्री करणार’ असा इशारा दिला.
याची माहिती पुलगाव पोलिसांना मिळताच पोलिसांनी लागलीच गावाकडे धाव घेतली. पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड यांनी आशाबाईची समजूत काढून गावातील सामाजिक भवनामध्ये गावकऱ्यांची बैठक घेतली.
गावात कोण दारुविक्री करतो त्याची माहिती द्या, आम्ही तात्काळ दारुविक्री बंद करुन, असे आश्वासन दिले. त्यानंतर आशाबाईने आपले आंदोलन मागे घेतले असून पोलिसांनीही तिला सोडून दिले. या अनोख्या धाडसी आंदोलनाने दारुविक्रे त्यांसह गावातील मद्यपीही हादरुन गेले आहे.