विहिणबाई जोरात; व्याह्याच्या घरात साधला धाडसी चोरीचा डाव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 01:08 PM2023-01-28T13:08:36+5:302023-01-28T13:14:31+5:30
पोलिसांनी लावला छडा : चाैघांना केली अटक, एकाचा शोध सुरू
वर्धा / कारंजा (घा.) : कारंजा येथील अशोक धुपचंद अग्रवाल यांच्या कुलूपबंद घरातून अज्ञात चोरट्यांनी रोख व दागिन्यांसह एकूण १४.८० लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याने कारंजा शहरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून, फरार असलेल्या एकाचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
अशोक अग्रवाल यांच्या मुलाच्या सुनेच्या आईनेच तिचा मुलगा व इतर तिघांचे सहकार्य घेत आपल्याच व्याह्याच्या घरी नियोजनबद्धपणे चोरी केल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. या चोरट्यांकडून पोलिसांनी एकूण ७ लाख ५ हजार ५७० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. अंजना गोपाल अग्रवाल (४६), अनिश गोपाल अग्रवाल (१८), महेश बबन गाडवे (३०, तिन्ही रा. म्हसोला, ता. आणी, जि. यवतमाळ) व दिलीप श्यामराव धोत्रे (४०, ह. मु. जवळा, ता. आर्णी, जि. यवतमाळ) अशी अटक केलेल्या आरोपींची, तर हेमंत पटेल (४०, रा. आर्णी, जि. यवतमाळ) असे फरार असलेल्या आरोपीचे नाव आहे.
पाच दिवसांची मिळविली पाेलिस कोठडी
सायबर सेल, स्थानिक गुन्हे शाखा तसेच कारंजा पोलिसांनी समांतर तपास करून कारंजा येथील अशोक अग्रवाल यांच्या घरातील चोरीचा छडा लावून चौघांना अटक केली आहे.
अटक केलेल्या चारही आरोपींना न्यायालयात हजर करून पोलिसांनी त्यांची पाच दिवसांची पोलिसकाेठडी मिळविली आहे. व्याह्याच्या घरी विहिणीलाच चोरी करण्याची वेळ का ओढावली, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलिस कोठडीदरम्यान आरोपींकडून अधिकची माहिती जाणून घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
७.०५ लाखांचा ऐवज हस्तगत
तपासादरम्यान खात्रीदायक माहिती मिळाल्यावर संशयितांना ताब्यात घेत गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करण्यात आली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या संशयितांना पोलिसांनी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अटकेत असलेल्या आरोपींकडून पोलिसांनी एकूण ७ लाख ५ लाख ५७० रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. हस्तगत केलेल्या ऐवजात सोन्याचे तीन नेकलेस, दोन जोड साेन्याचे झुमके, कानातले सोन्याचे रिंग, सोन्याच्या बांगड्या, तीन जोड तोरड्या, पांढऱ्या धातूचे १७ शिक्के, पांढऱ्या धातूच्या सिंदूरदानीचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुन्ह्याचा छडा लावण्यात यांचा राहिला सिंहाचा वाटा
कारंजा येथील धाडसी घरफोडीचा छडा लावण्यासह चार आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नूरूल हसन, अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे याच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक संदीप कापडे, नीलेश कट्टोजवार, दिनेश बोथकर, अनुप कावळे, अक्षय राऊत, विशाल मडावी, अंकित जिभे, सागर भोसले, मंगेश आदे, अभिषेक नाईक, प्रफुल वानखेडे, राकेश इतवारे, शाईन सय्यद, स्मिता महाजन यांनी केली.