बॅगची चेन उघडून चोरट्या महिलेने केले दीड लाख लंपास

By चैतन्य जोशी | Published: April 13, 2023 06:14 PM2023-04-13T18:14:46+5:302023-04-13T18:16:25+5:30

युनियन बॅंकेतील घटना : शेतकऱ्याची शहर पोलिसात धाव

woman stolen one and a half lakh by opening the chain of the bag of a customer in the bank | बॅगची चेन उघडून चोरट्या महिलेने केले दीड लाख लंपास

बॅगची चेन उघडून चोरट्या महिलेने केले दीड लाख लंपास

googlenewsNext

वर्धा : मक्त्याने केलेल्या शेतीचा मक्ता चुकविण्यासाठी पुतण्यासह बॅंकेत गेलेल्या शेतकऱ्याचे तब्बल दीड लाख रुपये चोरट्या महिलेने चोरुन नेले. ही घटना भामटीपूरा चौकात असलेल्या युनियन बॅंकेत घडली. याप्रकरणी शहर पोलिसात १२ रोजी तक्रार दाखल करण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार, दिलीप नानाजी हायगुने (४८) रा. गोजी हे मक्त्याने शेती करतात. शेतमालकाला २ लाख रुपये मक्ता द्यायचा होता. त्यांना बचत गटाने अडीच लाख रुपयांचा धनादेश दिला होता. तो धनादेश वटविण्यासाठी ते पुतण्यासोबत युनियन बॅंकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. बॅंकेत अनेकजण उपस्थित होते. धनादेश वटविला असता ५०० रुपयांच्या नोटांचे पाच बंडल बॅंकेतून मिळाले. ते सर्व पैसे दिलीप हायगुने यांनी पुतण्याच्या बॅगमध्ये ठेवले होते.

पुतण्याने ती बॅग खांद्यावर लटकवून ते दोघेही बॅंकेबाहेर निघाले. खाली उतरल्यावर त्यांना बॅगची चेन अर्धवट उघडी दिसली. त्यांनी बॅगमधील पैशांची पाहणी केली असता त्यात ५०० रुपयांचे तीन बंडल म्हणजेच दीड लाख रुपये दिसून आले नाही. अज्ञात चोरट्याने दीड लाख रुपये बॅगची चेन उघडून नेल्याचे समजताच हायगुने याने शहर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

महिला चोर ‘सीसीटीव्ही’त कैद

बँक परिसरात लागून असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत चोरटी महिला कैद झाली. दिलीप हायगुने यांचा पुतण्या बॅंकेतील लोखंडी फाटकातून बाहेर निघत असताना त्याच्या मागून आलेल्या चोरट्या महिलेने चेन उघडून पैशांचे तीन बंडल काढून घेतल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. चोरटी महिला चेहरा झाकून असल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले.

शेत मालकास द्यायचा होता मक्ता

अशोक सुर्यभान पाटील रा. भिमनगर मास्टर कॉलनी वर्धा यांच्या मालकीची गोजी येथील १४ एकर शेती दोन लाख रुपये मक्त्याने दिलीप हायगुने यांनी केली होती. मक्ता देण्यासाठी शेतमालक देखील त्यांच्यासोबत बॅंकेत गेला होता. बॅंकेखाली शेतमालक प्रतिक्षेत होता. हायगुने यांचे पैसे चोरी गेल्याने त्यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

Web Title: woman stolen one and a half lakh by opening the chain of the bag of a customer in the bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.