सेवाग्राम रेल्वे स्थानकात कानपूरच्या महिलेने दिला गोंडस मुलीला जन्म
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 12:52 PM2019-06-02T12:52:31+5:302019-06-02T13:38:16+5:30
सेवाग्राम रेल्वे स्थानकात कानपूरच्या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. कांचीगुडा-लखनौ या ट्रेनने लखनौच्या दिशेने जात असलेल्या फैझीन बानो या महिलेने सेवाग्राम रेल्वे स्थानकात मुलीला जन्म दिला आहे.
वर्धा - सेवाग्राम रेल्वे स्थानकात कानपूरच्या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. कांचीगुडा-लखनौ या ट्रेनने लखनौच्या दिशेने जात असलेल्या फैझीन बानो या महिलेने सेवाग्राम रेल्वे स्थानकात मुलीला जन्म दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फैझीन बानो यांना प्रवासादरम्यानच प्रसुती कळा सुरू झाल्या. महिलेची प्रकृती बिघडत असल्याचे लक्षात येताच घटनेची माहिती रेल्वेच्या हेल्पलाईन क्रमांकावर देण्यात आली.
वर्धा रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना त्याची माहिती मिळताच सदर महिलेला सेवाग्राम येथील रेल्वे स्थानकावर उतरवून महिला प्रतीक्षा केंद्रात नेण्यात आले. तेथेच महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फैझीन बानो यांनी एका मुलीला जन्म दिला. सध्या महिला व नवजात मुलीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. 04156 क्रमांकाची कांचीगुडा-लखनौ या एक्स्प्रेसच्या एस-5 मधील आसन क्रमांक 11 व 13 वरून फैझीन बानो व तिचे पती मोहम्मद इमतीयाज हे दोघे लखनौच्या दिशेने प्रवास करीत होते. ही रेल्वे गाडी सेवाग्राम रेल्वे स्थानकावर येण्यापूर्वी याच गाडीतील एका महिलेला प्रसुती कळा सुरू झाल्याची माहिती वर्धा रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना मिळाली होती. त्याच अनुषंगाने वर्धा रेल्वे सुरक्षा बलाच्या महिला कर्मचारी रेणूका श्रीवास व दीपक इंगळे हे दक्ष होते. त्यांनी तातडीने महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही पाचारण केले होते.
ट्रेन सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास सेवाग्राम रेल्वे स्थानकावर आल्यावर कर्तव्यावर असलेल्या या दोन्ही कर्मचाऱ्यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने गर्भवती महिलेला सेवाग्राम रेल्वे स्थानकाच्या आवारात असलेल्या महिला प्रवासी प्रतिक्षा कक्षात नेले. तेथे डॉ. ज्योती यांच्या उपस्थितीत फैझीन बानो यांची सुरक्षित प्रसुती झाली. फैझीन बानो या मुस्लीम महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर नवजात मुलीसह तिच्या मातेला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. नवजात मुलीच्या कुटुंबियांनी मातेसह मुलीची रुग्णालयातून सुट्टी करून घेत दोघांनाही हैद्राबाद येथे नेल्याची माहिती मिळत आहे.