महिलाच गावांचा विकास करू शकतात
By admin | Published: September 23, 2015 05:48 AM2015-09-23T05:48:48+5:302015-09-23T05:48:48+5:30
ग्रामीण भागाच्या आर्थिक व सामाजिक विकासासोबत कुटुंब विकासासाठी वर्धा येथील स्वयंसहाय्यता बचत गटाच्या
वर्धा : ग्रामीण भागाच्या आर्थिक व सामाजिक विकासासोबत कुटुंब विकासासाठी वर्धा येथील स्वयंसहाय्यता बचत गटाच्या वर्धिनींनी संपूर्ण राज्यात केलेले कार्य अभिनंदनीय आहे. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी केले.
ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत वर्धेच्या वर्धिनींनी राज्यात बचतगटाचे जाळे निर्माण करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल वर्धिनी स्रेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. विकास भवन येथे आयोजित संमेलनाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला अतिथी म्हणून जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीना, प्रकल्प संचालक प्रमोद पवार, नाबार्डच्या सहायक प्रबंधक डॉ. स्नेहल बनसोड, माहिती अधिकारी अनिल गडेकर, अग्रणी बँक व्यवस्थापक विजय जांगडा, अभियान व्यवस्थापक सचिन भगत, जिल्हा व्यवस्थापक देवेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.
देशाचा विकास करताना आधी गावांचा विकास आवश्यक आहे. विकास हा कार्यालयातून होत नाही तर प्रत्यक्ष गावत जावून करावा लागतो. यात शासनाच्या विविध योजनांची जोड असावी लागते. वर्धिनी पुढे येत नाही तोपर्यंत महिलांचा सहभाग मिळत नसल्यानेच विकास प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविणे आवश्यक असल्याचेही पोलीस अधीक्षक गोयल यांनी सांगितले.
संजय मीना यांनी वर्धा हा महिला बचत गटासाठी पायलट जिल्हा असून ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत २४३ वर्धिनींनी ठाणे, यवतमाळ, गोंदिया आदी पाच जिल्ह्यांत जावून बचत गटाचे जाळे निर्माण केले आहे. येथील महिला आज आत्मनिर्भर झाल्या आहेत. प्रकल्प संचालक प्रमोद पवार यांनी ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. महिलांत आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासोबतच विविध उपक्रमात सहभाग वाढवून प्रत्येक गावात स्वयंप्ररिका निर्माण करण्यात येत आहे. प्रत्येक कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागविण्यासोबतच अशा सर्व कुटुंबात सामाजिक व आर्थिक विकास या उपक्रमातून होत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक अभियान व्यवस्थापक सचिन भगत यांनी केले, तर स्वागत जिल्हा व्यवस्थापक देवकुमार कांबळे यांनी केले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे भालेराव यांनीही मार्गदर्शन केले.
उत्कृष्ट कार्याबद्दल वर्धिनी लता मिश्रा, रजनी मारवले, कांचन चौधरी, रजनी डमके, मंगला वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वर्धिनी संघटिका व त्यांच्या कुटुंबियांनी मनोगत व्यक्त केले. उत्कृष्ट संघटिकांनी केलेल्या कार्याबद्दल सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वर्धिनी प्रमुख अमितसिंग राटोले, सुकेशनी पार्थडे मीनाक्षी भातकुलवार, प्रणीता वरवटकर, शालिनी आदमने, किरण तातोडे, सिद्धार्थ भोतमांगे आदींनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)
जिल्ह्यात ७ हजार ३०० बचतगट; ७५ हजार महिलांचा सहभाग
जिल्ह्यात ७ हजार ३०० बचत गट असून ७५ हजार महिला या ग्रामीण जीवनोन्नती अभियानासोबत जुळलेल्या आहेत. ३१५ ग्रामसंघ, २९ संघटिका, अंतर्गत प्ररिका तसेच २४३ वर्धिनींचे जाळे संपूर्ण जिल्ह्यात पसरलेले आहे. वर्धा जिल्ह्याचे कार्य राज्यात उत्कृष्ट ठरल्यामुळे येथील वर्धिनींना संपूर्ण राज्यात प्रशिक्षणासाठी जावे लागते.
जिल्ह्यातील बचत गटाचे संपूर्ण आर्थिक व्यवहार ई-बुकाच्या माध्यमातून संगणकीकृत करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील पाच गावांमध्ये स्वच्छतेचा विशेष उपक्रम राबविण्यात आला असून प्रत्येक घरात स्वच्छता गृह, हात धुणे आदी आरोग्य संवर्धनाचे कार्यक्रमही वर्धिनींच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.