एस.टी.च्या चालक-वाहकाच्या हलगर्जीपणामुळे महिला जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:30 AM2018-03-10T00:30:06+5:302018-03-10T00:30:06+5:30
रापमच्या पुलगाव आगारातील वाहक व चालकांच्या मनमर्जी कामाचा फटका एका प्रवासी महिलेला शुक्रवारी सहन करावा लागला. बस मध्ये ती चढत असतानाच चालकाने वाहन पुढे नेले.
ऑनलाईन लोकमत
चिकणी (जामणी) : रापमच्या पुलगाव आगारातील वाहक व चालकांच्या मनमर्जी कामाचा फटका एका प्रवासी महिलेला शुक्रवारी सहन करावा लागला. बस मध्ये ती चढत असतानाच चालकाने वाहन पुढे नेले. यात सदर महिला जखमी झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वंदना गावंडे, असे जखमी महिलेचे नाव असल्याचे सांगण्यात आले.
पुलगाव आगाराची एम.एच. ४० एन. ८४५० क्रमांकाची बस वर्धेच्या दिशेने जात होती. ती बस प्रवासी घेवून येत असता दहेगाव (स्टे.) ला थांबली. यावेळी चालकाने वाहन सुरूच ठेवून प्रवाशांची चढ-उतार होऊ दिली. दरम्यान दहेगाव (स्टे.) येथील वंदना गावंडे या देवळीला जाण्यासाठी सदर
बसमध्ये चढत असताना वाहक उपेंद्र खैरकार यांनी घंटी वाजवली अन् चालक माणिक गेडाम याने वाहन पुढे नेले. अशातच वंदना बस खाली पडल्याने तिला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. महिलेला दुखापत झाल्याचे लक्षात येताच तिला परिसरातील नागरिकांच्या मदतीने तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी गजानन दुतारे, गौरव गावंडे, दिनेश पांडे, कुमार सिंगपुरे, अक्षय बनसोड, अमन वासे आदींनी सहकार्य केले.