उपचारांसाठी गेलेल्या महिलेचे दागिने लंपास, सेवाग्राम रुग्णालयातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 05:38 PM2021-12-21T17:38:28+5:302021-12-21T17:41:06+5:30
रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या महिलेचे दागिने अन्य एका महिलेने पळविले. चोरट्या महिलेने तोंडावर रुमाल बांधलेला होता तसेच तिच्यासोबत एक लहान मुलगीदेखील होती. या चोरीचा थरार रुग्णालयातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
वर्धा : डोक्याच्या आजारासाठी सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारांसाठी एमआरआय कक्षात गेलेल्या महिलेच्या बॅगमधील दागिने आणि रोख रक्कम अज्ञात महिलेने चोरून नेली. ही घटना सेवाग्राम रुग्णालयात घडली.
प्राप्त माहितीनुसार, सुलोचना श्याम नंदाने रा. चांदुर ढोरे, जि. अमरावती ही कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम येथे डोक्याच्या आजाराच्या उपचारांसाठी गेली होती. तिला एमआरआय करण्यासाठी पाठविले असता ती खोलीच्या बाहेर अंगावरील दागिने काढून बॅगमध्ये ठेवून ती बॅग भाऊ संजय मांढरे यांच्याकडे देऊन स्कॅन करण्यासाठी गेली. एमआरआय स्कॅन करून बाहेर आली असता बॅगमधून चोरट्याने सोन्याचे दागिने, सोन्याचे मणी, डोरले, मंगळसूत्र तसेच कानातले आणि ४ हजार रुपये रोख असा एकूण ३१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेलेला दिसून आला. त्यांनी याप्रकरणी लगेच सेवाग्राम ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली.
चोरटी महिला सीसीटीव्हीत कैद
चोरट्या महिलेने तिच्यासोबत असलेल्या लहान मुलीच्या मदतीने मोठ्या शिताफीने सुलोचना यांच्या बॅगमधून दागिने आणि रोख रक्कम काढून घेत पळ काढला. चोरट्या महिलेने तोंडावर रुमाल बांधलेला होता तसेच तिच्यासोबत एक लहान मुलगीदेखील होती. या चोरीचा थरार रुग्णालयातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.