खापरीच्या महिलांनी दारूबंदीसाठी पुकारला एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 05:00 AM2020-05-05T05:00:00+5:302020-05-05T05:00:34+5:30
खापरी गावात दारु गाळण्याचे ठिकठिकाणी मिनी कारखाने आहे. सकाळपासून गावात दारु पिणाऱ्यांचे जत्थे दारुविक्रेत्यांच्या घराकडे जाते. येथे उत्पादित झालेली दारु बाहेर गावातही पोहचवित होते. या सर्व घडामोडींचा परिणाम अनेक कुटुंबावर झाला. अनेकांच्या कुटुंबाची वाताहात झाली. महिलांना पतीकडून विनाकारण मारण्याचे प्रकार वाढले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : तालुक्यातील खापरी (मुंगापुर) येथील महिलांनी गावातील अवैध दारुच्या भट्टया व दारुविक्री विरोधात कंबर कसली आहे. दारुभट्टयांवर धाड टाकून तेथील मोहा सडवा रसायन व साहित्य नष्ट करण्यात आले. गावच्या महिला पोलीस पाटील यांनी त्यांना बळ दिले तर ठाणेदारांनीही महिलांच्या या दारुबंदी एल्गाराला कायदेशीर मदत करुन महिलांचे संसार उद्धवस्त करणाऱ्या दारू विके्रत्यांवर कारवाईचा सपाटा सुरू केला आहे.
खापरी गावात दारु गाळण्याचे ठिकठिकाणी मिनी कारखाने आहे. सकाळपासून गावात दारु पिणाऱ्यांचे जत्थे दारुविक्रेत्यांच्या घराकडे जाते. येथे उत्पादित झालेली दारु बाहेर गावातही पोहचवित होते. या सर्व घडामोडींचा परिणाम अनेक कुटुंबावर झाला. अनेकांच्या कुटुंबाची वाताहात झाली. महिलांना पतीकडून विनाकारण मारण्याचे प्रकार वाढले. मुलांच्या शिक्षणाकडे पालकांचे दुर्लक्ष होवू लागले. घरात उपवास पडण्याची वेळ आली. पिणारे पुरुष जास्त असल्याने गावात दारुड्यांचा बाजार वाढला. दारुच्या भट्यांचा गावा शेजारी धुर वाढला. लाखोची उलाढाल होवू लागली. घरातील कर्तेपुरुष व नवीपिढी बरबाद होतांना पाहुन काही महिला एकत्र आल्या. त्यांनी महिला पोलीस पाटील नम्रता गव्हाळे यांच्याशी चर्चा करुन सर्व महिलांनी एकत्र होवून पहिल्याच दिवशी हातात लाठ्या घेवून सपासपा पाऊल टाकील जंगलव्याप्त परिसरातील दारुभट्टी शोधून काढली व सर्व सडवा, रसायनासह भट्टी उद्धवस्त केली. ठाणेदार सुनील गाडे यांना माहिती देताच ते खापरीत पोेहचले व सर्व रणरागिनींच्या धाडसाचे कौतुक करुन सर्व महिलांशी पाठीशी असल्याचा शब्द दिला. सतत दुसºयाही दिवशी महिलांनी भट्टीवर धाड घालून सडवा रसायनला माती मोल केले. महिलांचा हा रुद्रावतार पाहुन खापरी सह आजुबाजुच्या गावात धडकी भरली आहे. दारुबंदी कमिटी अध्यक्ष प्रिया गव्हाळे, उषा बाराहाते, वनिता धोंगडे, उज्वला पिंपळे, कमल दुधवडे, विद्या दुधबडे, राधा कोरडे, मंगला वैद्य, वनिता पिंपळे, दुर्गा वास्कर, सरला दुधबडे, अर्चना वैद्य, संगीता कोहळे आदींनी या कामात सहभाग नोंदविला.
खापरी गावात महिलांचा दारुबंदी साठीचा एल्गार सुरुच राहिल. गावात दारुचा थेंब मिळणार नाही व कुणीही दारुभट्टया लावण्याचे धाडस करणार नाही. अशी परिस्थिती आम्हाला निर्माण करायची आहे. महिलांना गावचे सरपंच व प्रतिष्ठित मंडळी मदत करीत आहे.
-नम्रता गव्हाळे, पोलीस पाटील खापरी(मुंगापूर)