वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे कॉम्प्रेसरच्या स्फोटात महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 05:10 PM2017-12-16T17:10:31+5:302017-12-16T17:10:59+5:30
आजंती येथील श्रेयस पॅकेजींग इंडस्ट्रीजमध्ये (खर्डा फॅक्टरी) आकस्मिकरित्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाला. यात एका महिला कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : आजंती येथील श्रेयस पॅकेजींग इंडस्ट्रीजमध्ये (खर्डा फॅक्टरी) आकस्मिकरित्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाला. यात एका महिला कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली. रेखा तडस (४५) रा. सेंट्रल वॉर्ड हिंगणघाट, असे मृत महिला कामगाराचे नाव आहे.
शहरानजीक नागपूर मार्गावर आजंती औद्योगिक वसाहतीत आजंती येथील उपसरपंच राजेश कोचर यांची खर्ड्याचे कोन बनविण्याची फॅक्टरी आहे. रेखा रमेश तडस ही महिला कामगार तेथे कार्यरत आहे. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे ती आपल्या कामावर आली. खर्ड्याच्या ‘कोन’ची पॅकींग करीत असताना तिच्या काही फुट अंतरावरील हवेच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाला. कॉम्प्रेसर फुटल्यानंतर लोखंडाचा अवजड तुकडा उडून डोक्याला लागल्याने ही घटना घडली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
व्यवस्थापनाद्वारे साडेसात लाखाची मदत
ही घटना घडल्यानंतर मृतक रेखा तडस हिचे शव हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तेथे मृतकाच्या कुटुंबियांनी भरपाई म्हणून २५ लाख रुपयांची मागणी केली. यावेळी माजी आमदार राजू तिमांडे यांनी मध्यस्थी करून तोडगा काढल्यावर व्यवस्थापनाने मृतकाच्या कुटुंबीयांना साडेसात लाख रुपये देण्याचे मान्य केले. यावेळी न.प. अध्यक्ष प्रेम बसंतानी, नगरसेवक धनंजय बकाणे, देवा कुबडे, नरेश इवनाते, रूपेश लाजूरकर तसेच व्यवस्थापनातर्फे बिपीन पटेल व बबन कोचर यांची उपस्थिती होती. यावेळी खा. रामदास तडस व आ. समीर कुणावार यांनी दवाखान्यात येऊन मृतकाच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.
कुटुंबीयांना दिलासा
मृतक कामगार रेखाचे पती रमेश तडस हे मोहता सुतगिरणीत कापड खात्यात कामगार होते. कामगार कपातीत त्यांची नोकरी गेल्याने ते बेरोजगार झाले. यामुळे पतीसह तीन मुलींच्या संगोपनाची जबाबदारी रेखा तडस यांच्यावरच होती. त्यांच्या नोकरीवरच संसाराचा गाडा ओढला जात होता. व्यवस्थापनाने त्वरित ७ लाख ५० हजार रुपयांची मदत त्या कुटुंबाला केली. यामुळे त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.