कापूस वेचणाऱ्या महिला मजुरांची वानवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 09:10 PM2018-12-25T21:10:31+5:302018-12-25T21:10:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सेलू : तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी मजुरापुढे हात टेकले आहे. सितादहीचा वेचा झाल्यानंतर कापसाची वेचणीच झाली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी मजुरापुढे हात टेकले आहे. सितादहीचा वेचा झाल्यानंतर कापसाची वेचणीच झाली नाही. त्यामुळे शेत कापसाने पांढरे शुभ्र दिसत आहे. झाडावर एकही बोंड फुटायचे बाकी नाही. हा वेचा वेचल्यावरं कपाशीची उलंगवाडी होणार आहे. मात्र कापूस वेचणीसाठी मजुर मिळत नसल्याने पाऊस आल्यास कापूस मातीमोल होण्याची भिती शेतकऱ्यांना आहे.
यावर्षी सितादहीचा पहिला वेचा एकरी एक ते दोन क्विंटलचा झाला. त्यानंतर वेचा झालाच नाही. बहुतेक शेतकऱ्यांची शेतातील कपाशीची झाडे पांढरी शुभ्र झाली. आता हाच शेवटचा वेचा आहे. आता पाऊस आला नाही व मजुर मिळाले तर प्रति एकर दोन-तीन क्विंटल कापूस घरी येईल. सरासरी चार ते पाच क्विंटल कापसाचा उतारा आहे. शेतकºयाचे गणित विस्कटले आहे. बाजारातील कापसाचे दरही परवडणारे नाही. मेटाकुटीस आलेल्या शेतकºयांचा संसारच विस्कळीत झाला आहे. हातातोंडाशी आलेल्या कापूस वेचणीचा मेळ जुळत नसल्याने व निसर्गाच्या सततच्या फटक्याने शेतकऱ्याचे बजेटच विस्कटले आहे. सध्या शेतकरी अडचणीत आहे.
व्यापाऱ्यांकडून १०० ते २०० रूपयांनी पिळवणूक
कपाशीला यंदा ५५०० रूपये प्रतिक्विंटल भाव आहे. मात्र सर्वच शेतकऱ्यांना तो मिळत नाही. कापसाची गाडी खाली केल्यावर पुन्हा व्यापाऱ्यांचे नखरे सुरू होते. व शंभर, दोनशे कमी भाव दिल्या जातो. नाहीतर कापसाच्य गुणवत्तेबद्दल शंका उपस्थित केल्या जाते.
तरूण शेतकºयांनी शेती व्यवसायाकडे जावून आधुनिक पध्दतीने शेती केली. खर्च व उत्पन्न यांचा मेळ न बसल्याने त्यांच्या इच्छाशक्तीचा कोंडमारा झाला. सिंचनाची व्यवस्था नसणाऱ्यांना जबरदस्त फटका बसला
मजुर महिलांना सरासरी १३० रूपये मन (२० किलो) या प्रमाणे कापूस वेचाईचा दर आहे. एका दिवसात एक महिला ५० ते ६० किलो कापूस वेचते.
नव्या पिढीने शेती व्यवसायात रस दाखविला. आधुनिक तंत्रज्ञान वापरले मात्र मजुरापुढे व निसर्गापुढे हात टेकले. चार पैसे उरत नसेल तर शेती कोण करणार हा आम्हालाच पडलेला प्रश्न आहे.
- मनोज बोबडे, युवा शेतकरी, वडगाव (कला).