महिलांनी उद्योगातून आर्थिक उन्नती साधावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 11:51 PM2018-03-28T23:51:16+5:302018-03-28T23:51:16+5:30
महिला बचत गट अधिकाधिक प्रगतीपथावर गेल्यास महिला सक्षम होईल. या माध्यमातून अन्य महिलांना देखील प्रोत्साहित करणे गरजेचे आहे.
ऑनलाईन लोकमत
समुद्रपूर : महिला बचत गट अधिकाधिक प्रगतीपथावर गेल्यास महिला सक्षम होईल. या माध्यमातून अन्य महिलांना देखील प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ महिलांनी घेतला पाहिजे, असे प्रतिपादन आ. समीर कुणावार यांनी केले.
येथे आयोजित बेरोजगार महिला व किशोरी मुलींकरिता स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्यात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष नितीन मडावी तर मंचावर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. महिला व बालकल्याण सभापती सोनाली कलोडे, माजी पं. स. सदस्य अर्चना वानखेडे, जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री गफाट, हिंगणघाट पं. स. सभापती गंगाधर कोल्हे, समुद्रपूर पं.स. सभापती कांचन मडकाम, हिंगणघाटचे नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, समुद्रपूरच्या नगराध्यक्ष शिला सोनोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, ज्योती कडू, जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे, पं. स. गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, प्रदीप गयगोले, जि.प. सदस्या शुभांगी डेहणे, जयश्री चौखे, ज्योत्स्ना सरोदे, पं.स. उपसभापती योगेश फुसे, जि.प. सदस्य रोशन चौखे आदी हजर होते.
जि.प. अध्यक्ष नितीन मडावी म्हणाले की, महिला या छोट्या गृहउद्योगातून मोठ्या गृह उद्योगपर्यंत प्रगती करू शकेल. महिलांनी उद्योग क्षेत्रात प्रगती साधून स्वबळावर उभे राहण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले.
जि.प. सभापती सोनाली कलोडे यांनी गावांचा विकास कारयचा असेल तर स्त्रियांचा विकास होणे आवश्यक आहे. महिलांनी स्वत:हून अशा प्रशिक्षणांमध्ये भाग घेतला पाहिजे. तसेच सर्व महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक ज्योती कडू यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन निलांबरी सदन यांनी तर आभार अनिता भोयर यांनी मानले. देवळी-पुलगाव विधानसभा क्षेत्र स्तरावर देवळी येथे २९ मार्चला अश्याच पद्धतीचा स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी जि.प. सभापती कलोडे यांनी दिली. मेळाव्याला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.