सिलिंडरच्या भडक्यात महिला गंभीर
By admin | Published: May 14, 2017 12:41 AM2017-05-14T00:41:40+5:302017-05-14T00:41:40+5:30
घरगुती वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरमधून गॅस गळित होत त्यातून उडालेल्या भडक्याने महिला गंभीर जखमी झाली.
वडनेर येथील घटना : महिलेवर उपचार सुरू; पोलिसांकडून घटनेची नोंद
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : घरगुती वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरमधून गॅस गळित होत त्यातून उडालेल्या भडक्याने महिला गंभीर जखमी झाली. ही घटना शुक्रवारी रात्री वडनेर येथे घडली. चंदा कृष्णा मेघरे (४५) असे जखमी महिलेचे नाव आहे. तिच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहे.
पोलीस सुत्रानुसार, येथील कृष्णा मेघरे यांनी गावातील एका एजन्सीतून नवीन गॅस सिलिंडर आणले. दरम्यान, रात्री कृष्णा यांच्या पत्नी चंदा यांनी सिलिंडर लावले. यात काही क्षणातच सिलिंडरने पेट घेतला. यावेळी उडालेल्या भडक्यात चंदा गंभीररित्या भाजल्या गेल्या. याची माहिती परिसरात पसरली असता शेजाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत आगीवर ताबा मिळविला.
गॅस एजन्सीचे वितरक अजय ढोक व वडनेर पोलिसांनी घटनास्थळ गाठत पाहणी केली. यात जखमी झालेल्या चंदा यांना प्रथम ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी नागपूर येथे दाखल करण्यात आले. या घटनेची पोलिसांनी नोंद केली असून तपास सुरू आहे. या घटनेत भाजल्या गेलेल्या महिलेला शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी जोर धरत आहे.