जामनी पारधी बेड्यावरील महिला कातणार खादीचे सूत
By admin | Published: August 21, 2016 01:13 AM2016-08-21T01:13:56+5:302016-08-21T01:13:56+5:30
चोर व दारू गाळणारा समाज म्हणून ओळख असलेल्या पारधी समाजाला जीवनाच्या मुख्य प्रवाहात
पोलीस अधीक्षकांचा उपक्रम : उद्योग उभारणीकरिता अर्थसाहाय्य
आकोली : चोर व दारू गाळणारा समाज म्हणून ओळख असलेल्या पारधी समाजाला जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता पोलीस विभागाच्यावतीने नवजीवन योजना अंमलात आणली. या योजनेंतर्गत शनिवारी जामणी येथील पारधी बेड्यावर जात पोलिसांनी येथील महिलांना सूतकताई या उपक्रमाची माहिती दिली. त्यांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आश्वासन पोलिसांना दिल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक व नवजीवन योजनच्या प्रतिनिधी एकुरजे यांनी दिली.
जिल्ह्यात दारूबंदी असताना मोठ्या प्रमाणात दारू पकडल्या जात आहे. गावठी दारू गाळण्यात पारधी समाजाचा मोठा वाटा असल्याने या समाजाला या व्यवसायापासून परावृत्त करण्याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी नवजीवन योजना अंमलात आणली. या योजनेतून निवेदिता निलयमच्या माध्यमातून जामणी येथील पारधी बेड्यावरील महिलांना सुतकताईचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय झाला. याला बेड्यावरील महिलांनीही होकार दिला आहे. प्रकल्पाची माहिती देताना बेड्यावर सेलूचे ठाणेदार विलास काळे, राजेंद्र डाखोळे व निवेदिता निलयमचे ज्ञानेश्वर येवतकर यांची उपस्थिती होती.
जिल्हा पोलिसांच्या पुढाकराने पांढरकवडा पारधी बेडयातील महिलांना फिनाईल तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. यात पोलिसांना यश आले. याच धर्तीवर येथे सुद्धा निवेदीता निलयमच्या माध्यमातुन महिला व पुरुषांना सुतकताईचे प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यांना आवश्यक सामुग्री, साहित्य खरेदीकरिता कर्ज पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.(वार्ताहर)