महिला काँग्रेसचे थाळीनाद आंदोलन
By admin | Published: January 10, 2017 12:34 AM2017-01-10T00:34:33+5:302017-01-10T00:34:33+5:30
पंतप्रधानांनी काळा पैसा बाहेर काढणे आणि दहशतवाद कमी करण्याचा उद्देश ठेवत नोटाबंदचा निर्णय घेतला.
नोटाबंदीचा निषेध : मार्ग काढण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
वर्धा : पंतप्रधानांनी काळा पैसा बाहेर काढणे आणि दहशतवाद कमी करण्याचा उद्देश ठेवत नोटाबंदचा निर्णय घेतला. मात्र हे दोन्ही उद्देश बाजून राहत असून या निर्णयामुळे सर्वसामान्य जनता होरपळली जात असल्याचा आरोप करीत महिला काँग्रेसच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर थाळीनाद आंदोलन करण्यात आले. महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले गेले. निवेदन उपजिल्हाधिकारी लोणकर यांनी स्वीकारले.
शेतकऱ्यांना मिळत असलेल्या आधारभूत किमतीवर २० टक्के बोनस देण्यात यावा, दारिद्र्य रेषेखाली येत असलेल्या महिलांच्या बँक खात्यात २५ हजार रुपये जमा करा या दोन विशेष मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. यासह नोटबंदीचा निर्णय जाहीर झाला त्या दिवसापासून आतापर्यंत किती काळापैसा जमा झाला, भ्रष्टाचार कमी झाला काय, आदी प्रश्नही या निवेदनातून विचारण्यात आले आहेत. नोटबंदी जाहीर झाली त्या काळापासून अनेक एटीएम बंद अवस्थेतच आहेत. ते सुरू करण्यासंदर्भात काय निर्णय घेण्यात आला, तसेच त्यातून निघणाऱ्या पैशाची मर्यादा वाढविण्यात यावी, बँकेत असलेला शेतकरी व सर्वसामान्यांचा पैसा काढण्या संदर्भात असलेले निर्बंध हटविण्यात यावे, यासह अन्य महत्त्वपूर्ण मागण्यांकडेही निवेदनातून लक्ष वेधण्यात आले.
सदभावना भवनातून मोर्चाला प्रारंभ झाला. हा मोर्चा जिल्हा कचेरी मार्गावर असलेल्या न्यायालयाच्या प्रवेशद्वार परिसरात पोहचताच पोलिसांनी मोर्चकरांना अडवून धरले. यानंतर महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष मेघे यांच्या नेतृत्त्वात एका महिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले.