महिलांचा न्यायालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:45 AM2017-07-19T00:45:19+5:302017-07-19T00:45:19+5:30

महात्मा गांधी व विनोबा भावे यांची कर्मभूमी म्हणून ओळख असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारूविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

Women's Court Front | महिलांचा न्यायालयावर मोर्चा

महिलांचा न्यायालयावर मोर्चा

Next

ठाणेदारांना निवेदन : दारूबंदीच्या अंमलबजावणीची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : महात्मा गांधी व विनोबा भावे यांची कर्मभूमी म्हणून ओळख असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारूविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. दारूबंदीच्या अंमलबजावणीसाठी पोलीस प्रयत्न करीत असले तरी गाव-खेड्यात दारूविक्रीचा व्यवसाय सूरूच आहे. दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी मंगळवारी दुपारी सुरू असलेल्या पावसाची तमा न बाळगता सावित्रीबाई फुले दारूबंदीच्या महिलांनी थेट न्यायालयावर मोर्चा नेला. यावेळी न्यायालयाच्यावतीने पुलगावचे ठाणेदार मुरलीधर बुराडे यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले.
जिल्ह्यात नवीन वरिष्ठ अधिकारी येताच पोलिसांकडून दारूविक्रेत्यांवर कारवाई केली जाते. पोलीसही वॉश आऊट सारखी मोहीम राबवून लाखो रुपयाचा दारूसाठा पकडतात. तसेच दारूविक्रेत्यांना अटक करतात. परंतु, काही महिन्यांचा कालावधी लोटताच दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीचा पोलिसांनाच विसर पडत असल्याने हा अवैध व्यवसाय पुन्हा पायमुळ घट्ट करीत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. डॉ. आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुलगाव परिसरात खुलेआम दारूविक्री होत आहे. त्याबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाला वेळोवेळी निवेदने देण्यात आली;पण प्रभावी कारवाई होत नाही. दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणी करिता जीवाचा धोका पत्कारून कार्य करणाऱ्या महिला देशी, विदेशी व गावठी दारू पकडून पोलिसांच्या स्वाधीन करतात. त्यानंतर पोलिसही दारूविक्रेत्यांना अटक करते. पण, अवघ्या काही दिवसातच दारूविक्रेते जामीनावर सुटून येतात आणि पुन्हा बिनधास्तपणे दारूविक्रीचा व्यवसाय करतात. दारूविक्रीमुळे शेकडो कुटुंब उघड्यावर आले असून तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. न्यायालयाने पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य सूचना देत दारूविक्रेत्यांना कठोर शिक्षा द्यावी, दारूबंदीसाठी कार्य करणाऱ्या महिलांना पोलिसांनी वेळोवेळी सहकार्य करावे, सदर महिलांना ओळख पत्र द्यावे, अटक करण्यात आलेल्या दारू विक्रेत्याला जामीन देवू नये, दारूबंदीच्या महिला व पुरुष कार्यकर्त्यांना पोलीस संरक्षण द्यावे, तसेच पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये गांजा, ड्रग्ज, दारू आदी मादक पदार्थ विकणाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मोर्चात अनुसया उके, कल्पना शेतेवार, राजु लोहकरे, विनोद बोरकर, प्रवीण हावरे यांचेसह मोठ्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले होते.

Web Title: Women's Court Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.