जिल्हा कचेरीवर महिलांचा मोर्चा
By admin | Published: January 11, 2017 01:02 AM2017-01-11T01:02:13+5:302017-01-11T01:02:13+5:30
गरजूंना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात यावा, या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी मंगळवारी
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : गरजूंना शासकीय योजनांचा लाभ मिळावा
वर्धा : गरजूंना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात यावा, या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी मंगळवारी स्थानिक डॉ. आंबेडकर चौक येथून विदर्भ प्रदेश जेष्ठ नागरिक व निराधार अत्याचार मुक्ती संघर्ष समितीच्या नेतृत्त्वात महिलांनी मोर्चा काढला. हा मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकल्यावर येथे जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या निवेदनातून संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृद्धापकाळ योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या मासिक अनुदानात १ हजार ५०० रुपये प्रमाणे सुधारणा करण्यात यावी, निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे उत्पन्नांची मर्यादा २१ हजार रुपये वरुन ३५ हजार रुपये करण्यात यावी, संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ वृद्धापकाळ योजनेतील लाभार्थ्यांना भारतात कुठेही आजन्म मोफत बसप्रवास सुविधा व मोफत आरोग्य सेवा देण्यात यावी, निराधारांना दर महिन्याला नियोजित अनुदान देण्यात यावे, दिव्यांग व निराधार तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शासनाच्या अंत्योदय व अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यात यावा, घरगुती काम करणाऱ्या व हातमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना शासनाच्यावतीने वार्षिक १० हजार रुपये अनुदान देण्यात यावे, मायक्रोफायनांस कंपन्यांचे कर्मचारी व अधिकारी कर्ज वसुलीच्या नावाखाली महिलांना नाहक त्रास देत असून त्याच्याविरुद्ध कार्यवाही करीत महिलांना कर्जमाफी देण्यात यावी आदी मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेल्या या मोर्चाला न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर पोलीसांकरवी अडविण्यात आले. यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. आंदोलनाचे नेतृत्त्व मंगला ठक, रमेश घोडे, गुड्डू शर्मा, अनिल गुलानी, अफसाना शेख, जाधव यांनी केले. यात मोठ्या संख्येने महिला सहभागी होत्या.(शहर प्रतिनिधी)