विषय समित्यांवर महिलांचे प्राबल्य

By admin | Published: January 4, 2017 12:29 AM2017-01-04T00:29:48+5:302017-01-04T00:29:48+5:30

नगर परिषद निवडणुकीत भाजपाने जिल्ह्यातील सहाही पालिकांमध्ये निर्विवाद यश मिळविले.

Women's Subjects on Subject Committees | विषय समित्यांवर महिलांचे प्राबल्य

विषय समित्यांवर महिलांचे प्राबल्य

Next

सहाही पालिकांत भाजपचा वरचष्मा : स्थायी समिती सदस्यांचीही निवड
वर्धा : नगर परिषद निवडणुकीत भाजपाने जिल्ह्यातील सहाही पालिकांमध्ये निर्विवाद यश मिळविले. याच अनुषंगाने मंगळवारी या सहाही पालिकांच्या विषय समिती सभापती पदाची निवड करण्यात आली. यामध्येही अपेक्षेप्रमाणे सर्व समित्यांवर भाजपने कब्जा केला आहे. वर्धा पालिकेत सर्व सभापती भाजपचे तर स्थायी समितीत केवळ एक सदस्य राष्ट्रवादीच्या वाट्याला आले. अन्य नगर पालिकांतही भाजपच्या सदस्यांचा वरचष्मा राहिला. ३० पैकी २० सभापती महिला असल्याने विषय समित्यांवर महिलांचेच प्राबल्य आले आहे.
जिल्ह्यातील सहाही नगर पालिकेचे नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांच्या निवडीनंतर विषय समित्यांकडे पालिका क्षेत्रातील जनतेचे सर्वांचे लक्ष लागले होते. मंगळवारी सर्व पालिकांच्या प्रत्येकी पाचही विषय समितीच्या सभापतींची निवड करण्यात आली. या जागांकरिता अनेकांनी आपली फिल्डींग लावली होती. या समित्यांवरही जिल्ह्यात भाजप पदाधिकाऱ्यांचाच वरचष्मा राहिला. वर्धा नगर परिषदेमध्ये पिठासीन अधिकारी तहसीलदार मनोहर चव्हाण तथा नगराध्यक्ष अतुल तराळे, न.प. उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर यांच्यासह संपूर्ण नगर सेवकांच्या उपस्थितीत विशेष सभा घेण्यात आली. सभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर भाजपचे गटनेता प्रदीप ठाकरे यांनी विषय समितीच्या सभापती पदाकरिता नावे सुचविली. या नावांचे नगरसेवकांनी अनुमोदन केले. अनेकांनी सभापती पदी वर्णी लागावी म्हणून फिल्डींग लावली होती. सभेत तहसीलदार मनोहर चव्हाण यांनी प्राप्त नावांतून बांधकाम सभापतीपदी निलेश किटे, शिक्षण सभापती श्रेया देशमुख, महिला व बालकल्याण सभापती म्हणून शबीना परविन खान आणि उपसभापती रेणूका शरद आडे, स्वच्छता व पाणी पुरवठा सभापती सुमित्रा कोपरे आणि आरोग्य सभापती म्हणून मिना भाटीया यांची वर्णी लागली. स्थाई समितीवर भाजपचे रवींद्र गोसावी, मीना चावरे व राष्ट्रवादीचे शैलेंद्र झाडे यांची वर्णी लागली. ही निवड अविरोध झाली. स्थायी व विषय समित्यांकरिता राष्ट्रवादी काँगे्रसकडून गटनेता सोनल ठाकरे यांनी नावे सूचविली. यापैकी एकाची वर्णी स्थाई समितीवर लागली आहे. सर्व पालिकांमध्ये विषय समित्यांची निवड झाल्यानंतर आता पदाधिकाऱ्यांचा कोरम पूर्ण झाला असून आता ही मंडळी विकास कामांचा मुहूर्त केव्हा काढते, याकडे लक्ष लागले आहेत.(लोकमत न्यूज नेटवर्क)

स्थायी समिती झाली कार्यक्षम
नगर परिषदेच्या स्थायी समितीची निवड मंगळवारी करण्यात आली. यात पाच सभापती, एका उपसभापतीसह तीन सदस्यांची निवड करण्यात आली आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नियुक्त न.प. उपाध्यक्ष, सर्व नगरसेवक, स्वीकृत सदस्य आणि आता स्थायी समिती निश्चित करण्यात आली. यामुळे नगर परिषदेची टीम तयार झाली आहे. आता शहराच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न केले जाणार असल्याची मते यावेळी व्यक्त करण्यात आलीत.

विषय समित्यांच्या सभापतींची निवड झाल्यामुळे आता पूर्ण टीम तयार झाली आहे. आता शहराच्या विकासात ही टीम पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. येत्या आठ-दहा दिवसांत सर्व सभापतींसह शहराच्या विकासाचे नियोजन करण्यात येणार आहे. विकासाचा कार्यक्रम हा कालबद्ध राहणार असून यासाठी तंत्रज्ञानाचा पूरेपूर वापर केला जाार आहे. शिक्षण सभापतीच्या माध्यमातून पालिकेच्या कॉन्व्हेंटची निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे.
- अतुल तराळे, नगराध्यक्ष, नगर परिषद, वर्धा.

चार सभापतिपदांवर महिला विराजमान
देवळी - न.प. विषय समित्यांची निवडणूक अविरोध पार पडली. सर्व सभापती पदावर भाजप महिला सदस्यांची वर्णी लागली. न.प. उपाध्यक्ष प्रा.डॉ. नरेंद्र मदनकर यांच्याकडे पाणीपुरवठा व जलनि:सारण सभापती पद देण्यात आले. शिक्षण सभापती पदी कल्पना हरिदास ढोक, बांधकाम सभापती सारिका लाकडे, आरोग्य सभापती सुनीता बकाणे, महिला व बालकल्याण सभापती सुनीता ताडाम यांची निवड करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून महिलांना प्रतिनिधित्व देण्यात आल्याचे खा. रामदास तडस यांनी सांगितले. काँगे्रसने शिक्षण व बांधकाम समिती सभापती पदासाठी नामांकन दाखल केले; पण संख्याबळ नसल्याचे सांगितल्याने दोन्ही नामांकन परत घेतले. भाजप गटनेत्या शोभा तडस यांच्या मागणीनुसार चार न.प. सदस्यांची विषय समिती गठित झाली. समितीत भाजप तीन व काँग्रेस एक असे सदस्य घेण्यात आले. कामकाज उपविभागीय अधिकारी स्वप्नील तागडे, मुख्याधिकारी विजय देशमुख व नगराध्यक्ष सुचिता मडावी यांनी पाहिले.

पुलगावात भाजप चार तर बसपा-काँग्रेस आघाडीला एक
पुलगाव : नगर परिषदेची विशेष सभा पिठासीन अधिकारी एन.के. लोणकर यांच्या अध्यक्षतेत व मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर यांच्या उपस्थितीत दुपारी १ वाजता पार पडली. सभेत आघाडीचे ७ नगरसेवक उपस्थित होते. बसपाच्या नगरसेविका अर्चना लोहकरे पक्षादेशानुसार सभेत तटस्थ राहिल्या. नियमानुसार भाजपा आघाडीकडे चार तर बसपा-काँग्रेस आघाडीकडे एक सभापतिपद देण्यात आले. बांधकाम सभापती भाजपा आघाडीच्या पूनम सावरकर (अपक्ष), आरोग्य सभापती ममता बडगे, पाणी पुरवठा सभापती चंपा सिद्धानी यांच्याकडे देण्यात आले. नियमाप्रमाणे शिक्षण विभाग उपाध्यक्ष आशिष गांधी यांच्याकडे देण्यात आले तर बसपा-काँग्रेस-अपक्ष आघाडीकडे महिला व बाल कल्याण सभापती पद देण्यात आले. यासाठी गटनेता प्रमोद नितनवरे यांनी जमना खोडे यांची निवड केली. अत्यंत शांततामय वातावरणात निवडणूक पार पडली.

Web Title: Women's Subjects on Subject Committees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.