गवंडी कामगारांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 12:16 AM2018-10-07T00:16:01+5:302018-10-07T00:17:33+5:30
गवंडी बांधकाम कामगारांनी शनिवारी एकत्र येत बोरगाव (मेघे) परिसरातून मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. गवंडी बांधकाम मजदुर युनियनच्यावतीने काढण्यात आलेल्या या मोर्चाच्या माध्यमातून आंदोलनकर्त्या गवंडी कामगारांनी आपल्या विविध मागण्या शासनदरबारी रेटल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गवंडी बांधकाम कामगारांनी शनिवारी एकत्र येत बोरगाव (मेघे) परिसरातून मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. गवंडी बांधकाम मजदुर युनियनच्यावतीने काढण्यात आलेल्या या मोर्चाच्या माध्यमातून आंदोलनकर्त्या गवंडी कामगारांनी आपल्या विविध मागण्या शासनदरबारी रेटल्या.
बोरगाव (मेघे) परिसरातून काढण्यात आलेल्या या मोर्चा बजाज चौक, वर्धा बस स्थानक, इतवारा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक असा मार्गक्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचला. मोर्चा न्यायालयाच्या मुख्य द्वाराजवळ येताच पोलिसांनी अडविला. त्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. गवंडी बांधकाम कामगारांच्या दिव्यांग असलेल्या मुलांना आर्थिक मदत देण्यात यावी. गवंडी कामगारांना वयाच्या ५५ वर्षानंतर पेंशन देण्यात यावी. त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा. कल्याणकारी मंडळामध्ये गवंडी बांधकाम कामगारांमधील प्रतिनिधीची नेमणूक करण्यात यावी. सदर कामगारांची मध्यस्तीच्या माध्यमातून आर्थिक पिळवणूक होत असून मध्यस्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी. गवंडी बांधकाम कामगारांची नोंदणी शासनाच्या आदेशानुसार तालुकास्तरावर नेमलेल्या अधिकाऱ्यांमार्फत केली जात नसून ती करण्यात यावी या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाचे नेतृत्त्व स्वतंत्र मजदुर युनियनचे अध्यक्ष सागर तायडे, गवंडी बांधकाम कामगार मजदुर युनियनचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत रामटेके, माजी पं.स. सदस्य संतोष सेलूकर, अनिल इंगळे, गजानन खोब्रागडे यांनी केले. विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या सदर मोर्चात विठ्ठल शेंडे, बंडु फुलझेले, सुनील मेश्राम, चंदनदास आगलावे, भानुदास थुल, प्रमोद उरकुडे, दिलीप रहांगडाले, रविंद्र लांबट, यशवंत मानेश्वर, बबलू देशमुख, किशोर देशमुख, हिरामण बांगडकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष गवंडी बांधकाम कामगार सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
कामगारविरोधी धोरणांचा निषेध
सदर मोर्चा सिव्हील लाईन भागातील न्यायालयाच्या मुख्य द्वारासमोर येताच पोलिसांनी तो अडविला. त्यानंतर मोर्चाचे ठिय्या आंदोलनात रुपांतरण झाले. यावेळी मोर्चाचे नेतृत्त्व करणाऱ्यांसह काही गवंडी बांधकाम कामगारांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला.