जिल्हा परिषदेच्या १४ विभागांची कामे खोळंबली
By admin | Published: June 1, 2017 12:38 AM2017-06-01T00:38:54+5:302017-06-01T00:38:54+5:30
जिल्हा परिषदेमध्ये जिल्ह्यातील गाव-खेड्यातून शेकडो नागरिक दररोज विविध कामानिमित्त येतात;
खुर्च्या रिकाम्या : तासाभराने वीज पुरवठा सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हा परिषदेमध्ये जिल्ह्यातील गाव-खेड्यातून शेकडो नागरिक दररोज विविध कामानिमित्त येतात; पण बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास जिल्हा परिषदेतील विद्युत पुरवठा अचानक खंडित झाला. यामुळे जि.प.च्या १४ विभागांचे कामकाज खोळंबले होते.
उकाड्यामुळे अनेक अधिकारी, कर्मचारी कार्यालयाबाहेर असल्याचे दिसून आले. यामुळे विविध विभागातील अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या. तासाभरानंतर वीज पुरवठा सुरू झाल्याने अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परिणामी, जि.प.च्या प्रत्येक विभागात इन्व्हर्टर लावण्याची गरज व्यक्त होत आहे.
सिव्हील लाईन भागातील जिल्हा परिषदेच्या इमारतीत १४ विभागाचे कामकाज चालते. जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी, उपमुख्य कार्यपालन अधिकारी, जि.प. अध्यक्ष, जि.प. उपाध्यक्ष तथा चार सभापतींच्या दालनात इन्व्हर्टर लावण्यात आले आहे; पण यापैकी एका सभापतीच्या दालनातील इन्व्हर्टर चोरीला गेल्याची चर्चा दबक्या आवाजात बुधवारी सुरू होती. सध्या सर्वच काम आॅनलाईन पद्धतीने करण्यावर भर दिला जात आहे; पण जि.प.च्या काही विभागांत वीज पुरवठा खंडित झाल्यावर नेहमीच कामकाज ठप्प होत असल्याचे सांगण्यात आले. याचा सर्वाधिक त्रास नागरिकांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोसावा लागत असल्याने सर्व विभागात इन्व्हर्टर लावण्याची गरज व्यक्त होत आहे.