५५ वर्षे जुन्या इमारतीतून कामकाज
By admin | Published: May 29, 2015 01:55 AM2015-05-29T01:55:19+5:302015-05-29T01:55:19+5:30
तालुक्यातील ६३ ग्रा.पं. चा कारभार पाहणाऱ्या पंचायत समितीचे कामकाज आजही ५५ वर्षे जुन्या इमारतीतून सुरू आहे.
विजय माहुरे सेलू
तालुक्यातील ६३ ग्रा.पं. चा कारभार पाहणाऱ्या पंचायत समितीचे कामकाज आजही ५५ वर्षे जुन्या इमारतीतून सुरू आहे. जीर्ण झालेल्या इमारतीमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या पंचायत समितीची नवीन इमारतीची प्रतीक्षा कधी पूर्ण होणार, हा प्रश्नच आहे.
१९६१ मध्ये पंचायत समितीचा कारभार सुरू झाला, तेव्हा सेलू-हिंगणी मार्गावर प्रशस्त अशा विस्तीर्ण जागेवर ही इामरत उभी करण्यात आली. १९६२ मध्ये मोही येथील अमृत काटकर यांना प्रथम सभापती होण्याचा मान मिळविला. या परिसरात सभापतीचे निवासस्थान, गटविकास अधिकारी, पं.स. मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचे निवासस्थान येथेच होते. ते याच वसाहतीत वास्तव्यास राहत असत. अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहत असल्याने कामकाजाला गती मिळत होती; पण सध्या पं.स. मधील निवासस्थाने मोडकळीस आली आहे. काही इमारतीचे साहित्यही लंपास झाले. १५ वर्षांपूर्वी याच परिसरात सभापती निवासस्थान बांधण्यात आले; पण या निवासस्थानात कोणत्याही सभापतींनी वास्तव्य केले नाही. ती इमारत सध्या गोडावून म्हणून वापरात आहे. शिक्षण, पशुसंवर्धन व महिला बाल विकास विभागाचा कारभार १५ बाय १५ च्या पडक्या इमारतीतून सुरू असला तरी पंचायत समितीच्या मुख्य इमारतीत गटविकास अधिकारी, पंचायत, कृषी व लेखा कार्यालय आहे. या कार्यालयात कामानिमित्त आलेल्यांना उभे राहण्यासाठीही जागा नाही. यामुळे त्रास सहन करावा लागतो. एक विस्तार अधिकारी, टपाल विभाग व समाजकल्याण या विभागाचे तीन अधिकारी रेकॉर्ड रूममधून कामकाज करतात. पं.स. सभागृहात विविध योजनेतील साहित्य ठेवण्याची वेळ आली आहे. कृषी साहित्यासाठी पं.स. कार्यालयापासून दीड किमीवर गोदाम किरायाणे घ्यावे लागले. परिसरातील पडक्या इमारती पं.स.ची दुरवस्था दर्शवित आहे.
राजकीयदृष्ट्या येथील पंचायत समितीचे जिल्ह्यात वजन आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर ‘अच्छे दिन’ वाल्यांचे सरकार आहे आणि आमदार, खासदार तसेच राज्य आणि केंद्रातही एकछत्री सत्ता आहे. यामुळे पंचायत समितीच्या नवीन इमारतीचा मार्ग सुकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या दृष्टीने प्रयत्न होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.