बापूराव देशमुखांचे कार्य लोकांपर्यंत जावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:11 AM2018-02-24T00:11:15+5:302018-02-24T00:11:15+5:30
शिक्षण व सहकार क्षेत्रातील कार्याव्यतिरिक्त बापूराव देशमुखांचे सामाजिक व इतर क्षेत्रातील कार्यही मोठे आहे. ते पुढे आले पाहिजे. पुस्तकांच्या माध्यमातून दाआजींनी ज्यांच्यासाठी काम केले त्या बहुजनापर्यंत ते कार्य जायला हवे, .....
ऑनलाईन लोकमत
वर्धा : शिक्षण व सहकार क्षेत्रातील कार्याव्यतिरिक्त बापूराव देशमुखांचे सामाजिक व इतर क्षेत्रातील कार्यही मोठे आहे. ते पुढे आले पाहिजे. पुस्तकांच्या माध्यमातून दाआजींनी ज्यांच्यासाठी काम केले त्या बहुजनापर्यंत ते कार्य जायला हवे, असे प्रतिपादन माजी आमदार तथा यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. सुरेश देशमुख यांनी केले. स्थानिक प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते.
व्यासपीठावर माजी आमदार वसंतराव कार्लेकर, बापूराव देशमुख फाऊंडेशनचे अध्यक्ष शरद देशमुख, सचिव डॉ. भा.की. खडसे, सुधीर गवळी, प्राचार्य डॉ. रंभा सोनाये, डॉ. मालिनी वडतकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मालिनी वडतकर लिखित सहकार महर्षी बापूरावजी देशमुख या पुस्तकाचे प्रकाश करण्यात आले.
डॉ. कासारे म्हणाले की, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापासून आपल्या विदर्भातील पंजाबराव देशमुख यांच्यापर्यंतच्या समाजसुधारकानी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची ज्योत नेली. त्या सर्व कर्मवीर, थोर शिक्षण महर्षीच्या परंपरेतील अलीकडच्या काळातील लोक नेते म्हणजे बापूराव देशमुख होते, असे सांगितले.
डॉ. भा.की. खडसे यांनी जिल्ह्यावर मालगुजार श्रीमंताचा प्रभाव असताना तो दूर सारीत गाव खेड्यातील बहुजन, ग्रामीण तरूण नेतृत्वाला पुढे आणण्याचे कार्य बापूराव देशमुख यांनी केले. सर्व जातीपातीच्या सामान्य लोकांना सोबत घेऊन ते जात असे सांगितले. यावेळी माजी आमदार वसंतराव कार्लेकर, व सुधीर गवळी यांनीही मनोगत व्यक्त केले. सुरेश देशमुख यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. वडतकर यांनी केले. डॉ. अरूणा हरर्ले यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. संचालन मराठी विभाग प्रमुख डॉ. अनिता देशमुख यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ. रंभा सोनाये यांनी मानले. यावेळी सहकार क्षेत्रातील मान्यवर व वर्धेतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.