जागेच्या वादात रखडले स्मशानभूमी सौंदर्यीकरणाचे काम
By Admin | Published: October 4, 2014 11:30 PM2014-10-04T23:30:03+5:302014-10-04T23:30:03+5:30
स्थानिक पंचधारा स्मशानभूमीच्या सौंदर्यीकरण कामास पालिकेने प्रारंभ केला़ सदर काम प्रगतिपथावर असताना दारूगोळा भांडाराने त्या जागेवर आपला हक्क सांगत काम बंद पाडले. मालकीची जागा नसताना
किरण उपाध्ये - पुलगाव
स्थानिक पंचधारा स्मशानभूमीच्या सौंदर्यीकरण कामास पालिकेने प्रारंभ केला़ सदर काम प्रगतिपथावर असताना दारूगोळा भांडाराने त्या जागेवर आपला हक्क सांगत काम बंद पाडले. मालकीची जागा नसताना सौंदर्यीकरण प्रस्ताव पालिकेने कसा पाठविला, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ यात २ कोटी ५० लाख रुपयांचे काम मात्र रखडले आहे़
वर्धा नदीवरील पंचधारा येथील स्मशानभूमीत गत अनेक वर्षांपासून शहरातील मृतांवर अंत्यसंस्कार केले जातात़ पालिकेने येथे शेड बांधले व लोकांना बसण्याची व्यवस्था करून दिली़ नदीकाठावरील ऐतिहासिक पुरातन मंदिरात बसून नागरिक अंत्यविधी व अस्थी विसर्जनानंतरचे सोपस्कार पार पाडत होते; पण काही वर्षांपासून या मंदिरावर काही लोकांनी बेकायदा कब्जा केला होता. यामुळे नागरिकांना ऊन्ह, पाऊस, वारा आदींचा त्रास सहन करावा लागत आहे. ऐतिहासिक वास्तूवर संस्था स्थापन करून कब्जा करता येतो काय, असा प्रश्न समोर आला; पण पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले़
वाढती लोकसंख्या लक्षात घेता प्रेतावर अंत्यसंस्काराकरिता शेड कमी पडत होते़ शिवाय नागरिकांना बसण्यासाठी पूरेशी व्यवस्था नव्हती. यासाठी पालिकेने स्मशानभूमी विकास व सौंदर्यीकरणाची मागणी केली़ ही मागणी मंजूर करीत शासनाने अडीच कोटींचा निधी मंजूर केला़ पंचधारा स्मशानभूमीची जागा कुणाच्या मालकीची, याची चौकशी न करता कामास प्रारंभ करण्यात आला़ येथे कुंपण भिंत, दोन्ही बाजूस गेट, भिंत, शेडचे काम सुरू असताना सिएडी कॅम्प प्रशासनाने या जमिनीवर हक्क सांगत सदर बांधकाम बंद पाडले़ या प्रकारामुळे नागरिकांत आश्चर्य व्यक्त होत आहे़ आता या प्रकरणी प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़