समृद्धी महामार्गाचे काम जिल्ह्यात युद्धपातळीवर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 09:14 PM2019-05-22T21:14:12+5:302019-05-22T21:14:45+5:30
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वर्धा जिल्ह्याच्या तीन तालुक्यातून जात आहे. या तालुक्यातील ८७६ शेतकऱ्यांची जमीन खरेदी करण्यात येत आहे. जवळपास ७३५ शेतकऱ्यांची जमीन आतापर्यंत खरेदी करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वर्धा जिल्ह्याच्या तीन तालुक्यातून जात आहे. या तालुक्यातील ८७६ शेतकऱ्यांची जमीन खरेदी करण्यात येत आहे. जवळपास ७३५ शेतकऱ्यांची जमीन आतापर्यंत खरेदी करण्यात आली आहे.
जिल्ह्यात भूसंपादनाचे काम ८६.८ टक्के पूर्ण करण्यात आले आहे. वर्धा, सेलू, आर्वी या तीन तालुक्यातून हा महामार्ग जाणार असून या महामार्गाचे काम जिल्ह्याच्या सर्वाच तालुक्यात युद्धपातळीवर सुरू आहे. वर्धा शहरालगत असलेल्या पिपरी, पांढरकवडा आदी भागात या महामार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. वर्धा तालुक्यातून २३.९०० कि.मी., सेलू तालुक्यातून २५.१६० तर आर्वी तालुक्यातून ११.६७० कि.मी. चा समृद्धी महामार्ग जाणार आहे. सर्वाधिक १६ गावे सेलू तालुक्यातील असून वर्धा तालुक्यातील १० तर आर्वी तालुक्यातील आठ गावांतील शेतकºयांच्या जमिनी या महामार्गासाठी घेण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ३५०.४२ कोटी रुपयांचा मोबदला शेतकºयांना वितरित करण्यात आला असून उन्हाळ्याच्या दिवसातही मार्ग जाणार असलेल्या भागात जमीन सपाटीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आर्वी तालुक्यातून १८५, सेलू तालुक्यातून ३९९ आणि वर्धा तालुक्यातील २९२ शेतकºयांकडून जमीन घेण्यात आली आहे. सेलू तालुक्यातील २५७.०६२, वर्धा तालुक्यातून २०६.१७२, आर्वी तालुक्यातून ११६.२३ हेक्टर जमीन शेतकºयांकडून घेण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यात सध्या समृद्धी महामार्गाशिवाय बुट्टीबोरी ते तुळजापूर या जुन्या महामार्गाचेही विस्तारीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.