व्हिल्स इंडियाच्या कामगारांचे काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:21 AM2018-03-10T00:21:02+5:302018-03-10T00:21:02+5:30
येथील औद्योगिक वसाहतीतील व्हिल्स इंडिया कंपनीच्या स्थायी व अस्थायी कामगारांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन पुकारले. कामगारांच्या मागण्यासंदर्भात कंपनी प्रशासनाला चार पत्रे देवून सुद्धा दखल घेतली नसल्याने संघटनेच्यावतीने रोष व्यक्त करण्यात आला....
ऑनलाईन लोकमत
देवळी : येथील औद्योगिक वसाहतीतील व्हिल्स इंडिया कंपनीच्या स्थायी व अस्थायी कामगारांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन पुकारले. कामगारांच्या मागण्यासंदर्भात कंपनी प्रशासनाला चार पत्रे देवून सुद्धा दखल घेतली नसल्याने संघटनेच्यावतीने रोष व्यक्त करण्यात आला.
या कंपनीत जिल्ह्यातील कामगारांची संख्या अधिक आहे. यापैकी बरेचशे कामगार वर्धा मुक्कामी राहत असून रात्री १२ वाजेनंतर शिफ्ट संपल्यानंतर त्यांना दुचाकीने जावे लागते. यामुळे कंपीच्यावतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुरविलेली बससेवा कंपनीच्या टिममेंबर व टेक्निशियनला सुद्धा लागू करण्यात यावी अशी मागणी कामगारांकडून करण्यात आली. या कंपनीत ठेकेदार पद्धतीत काम करणाºया व अस्थायी कामगारांना १२ तास पर्यंत राबवून घेतले जात आहे. या कंपनीत पटले कॉन्ट्रक्टर यांच्या व्यतिरिक्त ओईएस, जेईएस, एसईडब्ल्यु, डिके, एसकेएस, नागा आदी कॉन्ट्रक्टर काम पाहत असून पावणे तीनशे कामगार कार्यरत आहे. त्यांच्याकडून आठ तासांऐवजी १२ तास काम करून घेतल्या जात आहे. कामगारांचा पीएफ कापला जातो; परंतु त्यांचा नंबर दिल्या जात नाही. कुशल व अकुशल दराने वेतनाची वर्गवारी करुन वेतन दिले जात नाही. कामगारांना वेतन स्लीप दिली जात नाही. आदी अनेक प्रकारे कामगारांची लुट केली जात आहे.
बहुतांश कामगार गरजु असल्यामुळे त्यांना वेळोवेळी कामावरुन कमी करण्याची धमकी दिली जाते. गत दोन दिवसापासून संप सुरू आहे; परंतु याबाबत कंपनीने कोणताही पुढाकार न घेता कामगारांची आर्थिक कोंडी केली आहे. कारखाना प्रशासन मनमानी कारभार करीत असल्याने याबाबत मानव संसाधन, कामगार आयुक्त जिल्हाधिकारी यांनी संबंधितांना समज देण्याची मागणी कामगार संघटनेचे दिलीप उटाणे, अतुल ठाकरे, गणेश रावेकर, रशीक पोपटकर, बादल भालशंकर, पवन ढगे, पंकज हागोडे यांच्यासह कामगारांच्यावतीने करण्यात आली आहे.