बहुप्रतिक्षित रेल्वे उड्डाणपुलाचे काम जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 11:56 PM2017-09-06T23:56:43+5:302017-09-06T23:56:54+5:30
मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर पुलगाव-आर्वी मार्गावरील गेटमुळे वाहतुकीची कोंडी होत होती. रेल्वे लाईनमुळे शहरही उत्तर-दक्षिण, असे विभागले गेले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर पुलगाव-आर्वी मार्गावरील गेटमुळे वाहतुकीची कोंडी होत होती. रेल्वे लाईनमुळे शहरही उत्तर-दक्षिण, असे विभागले गेले आहे. यामुळे उड्डाणपुलाची मागणी होती. दोन वर्षांपूर्वी ती मान्य झाली असून ४५ कोटींच्या पुलाचे काम सुरू झाले; पण गेटजवळ खांबासाठी खोदलेल्या २० फुट खोल खड्ड्यामुळे अपघाताची तथा जलवाहिनी फुटल्यास पाणी पुरवठा प्रभावित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अनेक वर्षापासून या उड्डाणपुलाच्या निर्मितीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत होते. जागा, मुख्य बाजारपेठ बांधकामासाठी लागणारा निधी व काही अन्य कारणांनी उड्डाणपुलाचा प्रश्न रेंगाळला होता. यात हैद्राबाद, भोपाळ या मार्गावर जड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू झाली. रेल्वे फाटक बंद राहत असल्याने कित्येक तास जड वाहनांच्या रांगा लागतात. ही कोंडी सुटावी म्हणून लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले व हा प्रश्न मार्गी लागला. सध्या ४५ कोटींच्या उड्डाणपुलाचे काम जोमाने सुरू झाले आहे. यात राज्य शासन ३५ कोटी तर केंद्र शासनाकडून १० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. या उड्डाणपुलाची लांबी ६५६ मीटर तर रूंदी १२ मीटर राहणार आहे. रेल्वेच्या तीन खांबांसह (पिलर्स) एकूण ३४ खांब आहेत. उड्डाणपूल तीन पदरी आहे. पुलाचा उतार आर्वी नाका व दुसºया बाजूचा उतार कॉटन मील भिंतीवर दक्षिणेकडे पंचधारा रोडकडे निघणार आहे. पुलाच्या ३४ पैकी अनेक खांबांसाठी मोठे खड्डे खोदून खांब उभे करण्याचे, नाल्यावरील पुलाचे काम सुरू आहे; पण रेल्वे क्रॉसिंगजवळ खांबासाठी खोदलेला खड्डा हा पुलगाव-आर्वी मार्गाच्या अर्ध्या भागात आहे. या खड्ड्यात पाणी पुरवठ्याची मुख्य जलवाहिनी आहे. खोदकामामुळे जलवाहिनी उघडी पडली असून तिला तीन जोड आहे. जलवाहिनीला आधार नसल्याने ती फुटून शहराचा पाणीपुरवठा प्रभावित होऊ शकतो. शिवाय अर्धा रस्ता खोदकामात असून उर्वरित रस्त्याने वाहतूक सुरू आहे. खड्ड्यात असलेल्या पाण्यामुळे ओलसर माती घसरल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता संभाव्य धोका लक्षात घेता संबंधित विभागाने येथील कंत्राटदारास सूचना दिल्याचे सांगण्यात आले. या ठिकाणी सुरू असलेल्या खोदकामाकडे बांधकाम विभाग तथा संबंधित कंत्राटदार कंपनीने लक्ष देत उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.