मैत्रीपूर्ण सामन्यात श्रमिक पत्रकार संघ विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 11:40 PM2017-09-14T23:40:22+5:302017-09-14T23:41:33+5:30
जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेत श्रमिक पत्रकार, इतर कर्मचाºयांचा सहभाग असलेल्या संघाने क्रिकेटच्या झटपट प्रकारात सात गडी व दोन चेंडू राखून विजय मिळविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेत श्रमिक पत्रकार, इतर कर्मचाºयांचा सहभाग असलेल्या संघाने क्रिकेटच्या झटपट प्रकारात सात गडी व दोन चेंडू राखून विजय मिळविला. या अत्यंत चुरशीच्या सामन्याचा पोलीस अधीक्षक, इतर बडे अधिकारी, ज्येष्ठ पत्रकार ते नवोदित बातमीदारांनी आनंद घेतला. सामन्याचे यश म्हणजे शरीर सुदृढ ठेवण्याचा महत्त्वपूर्ण संदेश त्यातून देण्यात आला.
श्रमिक पत्रकार संघ व पोलीस अधिकारी, कर्मचाºयांच्या एकत्रित संघात झालेल्या १२ षटकांच्या सामन्याचा आस्वाद घेण्याकरिता विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. नाणेफेकीचा कौल पोलीस संघाच्या बाजूने गेला. त्यांनी फलंदाजी करीत ९१ धावांचे लक्ष्य दिले. यात पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत कडू यांनी ३६ धावा, एक बळी व झेल घेतला. त्यांच्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. श्रमिक पत्रकार संघाच्या फलंदाजांनी संयमी खेळी करीत लक्ष्याचा पाठलाग केला. सामना अटीतटीचा झाला असताना त्यांनी संयमाने विजय मिळविला.
श्रमिक पत्रकार संघाचे विशाल कत्रोजवार, अजय कुमार यांनी उत्तम फलंदाजी केली. गोलंदाजीत अजय कुमार, कर्णधार किशोर मानकर, उप कर्णधार प्रवीण धोपटे, रूपेश खैरी, गजानन गावंडे यांनी चोख कामगिरी बजावली. व्हीसीएने अम्पायर म्हणून नियुक्ती केलेले अभिजीत ढोबळे व पोलीस कर्मचारी सुधाकर हूड यांनी पंचगिरी केली. सामन्याचे समालोचन किशोर पाटील यांनी केले. सत्कार कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ. प्रवीण वानखेडे, प्रफुल्ल व्यास यांनी केले तर संजय खल्लारकर यांनी स्कोरर म्हणून काम पाहिले. नाणेफेकीनंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंशी पोलीस अधिकारी, प्रशांत देशमुख यांनी हस्तांदोलन केले. यावेळी हेल्पींग हार्ट चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष सोनाली श्रावणे, व्यावसायिक आसिफ जाहीद शेख उपस्थित होते. पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस, पोलीस उपअधीक्षक सुभाष सावंत, रमेश निमजे, आनंद शुक्ला, ठाणेदार मुरलीधर बुराडे, संतोष शेगावकर यासह नागरिक उपस्थित होते. श्रमिक पत्रकारांच्या संघात प्रशांत हेलोंडे, चैतन्य जोशी, बाळा चतारे, पवन काकडे, धीरज ठावरे यांचा तर पोलीस संघात अचल मलकापुरे, मिलिंद पारडकर, सुबोध ठाकरे, लिंगाडे, ठाकूर यांचाही समावेश होता.
किशोर मानकर सामनावीर
राष्ट्रीय स्तरावर स्फोटक फलंदाजीने काळ गाजविणारे तथा श्रमिक पत्रकार क्रिकेट संघाचे कर्णधार किशोर मानकर यांनी याही सामन्यात लौकिक राखत सामनावीराचा पुरस्कार प्राप्त केला. मानकर यांनी ४८ धावा करीत दोन षटकांत एक बळी घेतला. सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक बढीये यांनी मानकर यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला. क्रिकेटपटू, प्रशिक्षक व संघटक म्हणून योगदान देणाºया जिल्हा क्रिकेट संघटनेचे नवनियुक्त अध्यक्ष किशोर पोफळी, सचिव अविनाश वंजारी, फलंदाज प्रवीण जगताप, विशाल साठवणे, अभिजीत ढोबळे यांचाही सत्कार करण्यात आला.