खत कारखान्यात कामगारांचे आंदोलन
By Admin | Published: May 30, 2017 01:11 AM2017-05-30T01:11:36+5:302017-05-30T01:11:36+5:30
स्थानिक एमआयडीसी भागातील महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित खत कारखान्यातील ४० कंत्राटी कामगारांनी...
विविध सुविधांसह योग्य वेतन देण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्थानिक एमआयडीसी भागातील महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित खत कारखान्यातील ४० कंत्राटी कामगारांनी विविध मागण्यांसाठी रविवार पासून कामबंद आंदोलन सुरू केले. सोमवारी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर योग्य तोडगा न निघाल्याने हे आंदोलन सायंकाळी उशीरापर्यंत सूरू होते.
महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित खत कारखान्यात सदर कंत्राटी कामगार गत १० ते १२ वर्षापासून काम करतात. दर वर्षी महामंडळाकडून कंत्राटदार बदलविला जातो. सदर कामगार बऱ्याच वर्षांपासून या खत कारखान्यात काम करीत असले तरी त्यांना पाहिजे त्या सोई-सूविधा उपलब्ध करून दिल्या जात नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. २१ मे २०१७ ला नवीन कंत्राटदाराने या ठिकाणी काम घेतले. येथील कामगारांच्या बँकखात्यात ९ हजार ३०० रुपये इतके मासीक वेतन वळते केले जात होते. परंतु, नवीन कंत्राटदाराने कंत्राटी कामगारांच्या वेतनात घट करीत अल्प वेतन देण्याचे धोरण अवलंबले आहे. हा प्रकार कामगारांवर अन्याय करणारा असून योग्य वेतन देण्यात यावे यासह कामगारांना प्राथमिक सोई-सूविधा देण्यात याव्या या मागणीसाठी खत कारखान्यातील कंत्राटी कामगारांनी प्रहारच्या नेतृत्त्वात रविवारपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. सोमवारी आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह कामगार अधिकारी, उपविभागीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. कामगारांच्या मागण्यांवर वेळीच योग्य तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. आंदोलनात प्रहारचे शहर प्रमुख विकास दांडगे, शरद टाले, मुकेश शेंद्रे, अतुल घाडगे, दिलीपसिंग ठाकूर, सुमेध माहूरे, प्रमोद कळणे यांच्यासह आदी कामगार सहभागी झाले आहे.
दिले जात होते सात हजार वेतन
सदर खत कारखान्यातील कंत्राटी कामगारांना पूर्वी ९ हजार ३०० रुपये मासीक वेतन दिल्या जात होते. मात्र, नवीन कंत्राटदाराने कामगारांच्या वेतनात घट करीत त्यांना ७ हजार ८८ रुपये वेतन देण्याचे निश्चित केल्याने हा प्रकार कामगारांवर अन्याय करणारा असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
आपणाला टर्न बेसीसवर कंत्राट मिळाला आहे. कंत्राटी कामगारांना आपण नियमांना अनुसरून मासीक वेतन देत आहो. सध्या दिल्या जात असलेल्या वेतनापेक्षा जास्त वेतन देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांची असून आपण त्यासंबंधी महामंडळाच्या वरिष्ठांशी बोललो आहे. ते जो निर्णय घेतील त्याची माहिती आपण आंदोलनकर्त्यांना देऊ.
- दिलीप गुंजाल, खत कारखान्यातील कंत्राटदार.