कर्मचारीच करतात रेती माफियांना सतर्क
By admin | Published: September 17, 2015 02:44 AM2015-09-17T02:44:13+5:302015-09-17T02:44:13+5:30
नजीकच्या नदी नाल्याच्या पात्रातून रेतीची चोरी सुरू आहे. महसूल व पोलीस विभागाला याची पूर्ण माहिती आहे; .....
प्रशासनाच्या लाखो रूपयांच्या महसुलाला चुना : सूचनेकरिता मोबाईल संच उत्तम साधन
वायगाव (नि.) : नजीकच्या नदी नाल्याच्या पात्रातून रेतीची चोरी सुरू आहे. महसूल व पोलीस विभागाला याची पूर्ण माहिती आहे; पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते. रेती माफीयांशी हात मिळवणी केली जात असल्याने रेती घाटावर चोरी पकडण्यासाठी धाड टाकण्याचा केवळ फार्स केला जातो. महसूल, पोलीस यंत्रणेच्या धाडीबाबत कर्मचारीच रेतीमाफियांना सतर्क करीत असल्याचे वास्तव आहे. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
महसूल मिळावा म्हणून प्रशासन रेतीघाटाचे लिलाव करते; पण लिलाव न झालेल्या घाटांतूनही सर्रास रेतीचा उपसा केला जात असल्याचे दिसून येत आहे. यात प्रशासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचे दिसते. महसूल व पोलीस यंत्रणेकडून रेती चोरीवर आळा घालण्यासाठी धाडसत्र राबविले जाते; पण या कारवाईची पूर्वकल्पना रेती माफीयांना दिली जाते. यामुळे अधिकाऱ्यांच्या हाती काहीही लागत नाही. असे प्रकार अनेक घाटांवर पाहावयास मिळतात.
कारवाईपासून बचावाकरिता राजकीय दबाव व शासकीय नामदारी पदे रेती माफीयांनी प्राप्त केल्याचेही दिसून येते. यातूनच ते अधिकाऱ्यांशी हात मिळवणी करतात. विशेष म्हणजे महसूल व पोलीस विभागाचे काही अधिकारी, कर्मचारी रेती माफीयांना दूरध्वनी वा भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून धाड मोहिमेची सूचना देतात. एकंदरीत धाडसत्र म्हणजे ‘मॅसेज’ मोहीम असल्याची बाब उघडपणे वायगाव सर्कलमधील सरूळ यशोदा नदी, सोनेगाव (बाई) भदाडी नदी व आलोडा बोरगाव या रेती घाटावर पाहावयास मिळते. सोनेगाव (बाई) या रेती घाटापासून प्रशासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळू शकतो. अनेक घाटांतूनही मोठ्या प्रमाणात महसूल मिळू शकतो; पण अधिकारी, कर्मचारी व रेती तस्कर महसूल बुडवत असल्याचे समोर आले आहे.
पर्यावरणाच्या नावावर अनेक रेतीघाटांचे लिलाव करण्यात आले नाही; पण रेती उपस्यावर कसलेही बंधन नसल्याचे दिसून येते. वायगाव निपाणी नजीकच्या नाले, नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी होत आहे. रेतीचोर दिवसाढवळ्या ट्रक ट्रॅक्टर तसेच मिळेल त्या वाहनाने चोरी करीत असल्याचे दिसते. याबाबत ग्रामस्थांकडून तक्रारीही करण्यात आल्या; पण कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. महसूल विभागालाही याची माहिती असते; पण त्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जाते. कारवाईचा केवळ देखावा केला जातो. परिणामी, मसहूल विभागाला लाखो रुयांचा फटका बसत आहे.
वायगाव नजीकच्या सोनेगाव (बाई), सरूळ, आलोडा बोरगाव, सिरसगाव धनाढ्य येथेही मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा सुरू आहे. लिलाव न झालेल्या सोनेगाव बाई येथील रेती घाटातून अव्याहत रेती उपसा सुरू आहे. वर्धा व देवळी तालुक्यांतर्गत येणाऱ्या या घाटांची अक्षरश: चाळणी केली जात असल्याचे दिसते. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)